Published On : Fri, May 19th, 2017

आयुक्तांनी बदलला कॉंग्रेसचा गटनेता

Advertisement


नागपूर: महापालिकेच्या राजकारणात आज मोठी उलथापलथ झाली. विभागीय आयुक्तांनी कॉंग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर यांना हटवून त्यांच्याऐवजी सोळा नगरसेवकांचा पाठिंबा असलेल्या तानाजी वनवे यांची नियुक्ती केली. यामुळे ठाकरे-महाकाळकर गटला जबर धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे विकास ठाकरे यांचे स्वीकृत सदस्यत्व धोक्‍यात आले आहे.

कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी तीन दिवसांपूर्वी गटनेता बदलण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. एकूण 17 नगरसेवकांचे समर्थनपत्र जोडून तानाजी वनवे यांना गटनेता करण्याची मागणी केली होती. गुरुवारी महाकाळकर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून विकास ठाकरे यांच्या नावाचा अर्ज महापालिका आयुक्तांकडे सोपविला तर तानाजी वनवे यांनी किशोर यांच्या नावाचा अर्ज दिला. यामुळे कोणाचा अर्ज फेटाळतात आणि कोणाच वैध ठरविला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान विभागीय आयुक्तांनी तानाची वनवे यांची गटनेतेपदी नियुक्ती करून सर्वांनाच धक्का दिला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विभागीय आयुक्त
4 मार्चला गटनेते म्हणून निवड झालेले संजय महाकाळकर यांची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे. कॉंग्रेसच्या एका गटाने 16 तारखेला बैठक घेतली. तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड केली. यासंदर्भात 17 नगरसेवकांच्या स्वाक्षरीच्या पत्रासह वनवे यांनी विभागीय आयुक्तांपुढे गटनेतेपदावर दावा केला. त्यानुसार 16 तारखेला वनवे यांच्या झालेल्या निवडीला आज मान्यता दिल्याचे महापालिकेला पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.

मुत्तेमवार, ठाकरे गटाला धक्का
तानाजी वनवे यांच्या निवडीने माजीमंत्री विलास मुत्तेमवार व शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना चांगलाच धक्का बसला असून सतीश चतुर्वेदी-नितीन राऊत गटाची सरशी झाली. स्वीकृत सदस्यपदी विकास ठाकरेंना रोखण्यासाठी त्यांच्या विरोधी गटाने एक पाऊल पुढे केले आहे. त्यामुळे आता स्वीकृत सदस्यपदी त्यांच्याऐवजी किशोर जिचकार यांची निवड झाल्यास आश्‍चर्य वाटू नये, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अर्ज पडताळणीत केवळ कागदपत्रांची तपासणी
महापालिकेने आज स्वीकृत सदस्यपदासाठी आलेल्या नामांकन अर्जाची पडताळणी केली. यात अर्जासोबत जोडलेले शिक्षण, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी, अपत्य, शौचालय याबाबतच्या शपथपत्राचा विचार करण्यात आला. गटनेत्याच्या शिफारसीच्या पत्राबाबत विचार करण्यात आला नसल्याने किशोर जिचकार यांचाही अर्ज वैध ठरला आहे. मात्र गटनेत्याच्या शिफारसीचा मुद्दाही प्रशासन तपासून पाहणार असल्याचे आयुक्त मुदगल यांनी सांगितले.

कोर्टात जाणार: महाकाळकर
विभागीय आयुक्तांनी घाईगडबडीत निर्णय जाहीर केला असून याविरोधात पुढील एक-दोन दिवसांत न्यायालयात जाणार असल्याचे संजय महाकाळकर यांनी सांगितले. काही लोकांनी सतरा जणांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले होते. त्यातील केवळ 16 लोकांचीच ओळख करण्यात आली.अर्थात ओळखपरेडची प्रक्रियाच पूर्ण झाली नाही. विभागीय आयुक्तांच्या घाईमागे नेमका काय हेतू आहे, हेही तपासण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बहुमताच्या आधारे निवड: वनवे
बहुमताच्या आधारे विभागीय आयुक्तांनी गटनेतेपदी निवड केल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले. संजय महाकाळकर यांच्या मागे बहुमत नव्हते, मात्र, पक्षाचा निर्णय म्हणून त्यांना मान्यता दिली. महाकाळकर यांनी विविध समित्यांमध्ये नियुक्तीसाठी नगरसेवकांना विश्‍वासात घेतले नसल्याने नाराजी होती. त्यामुळे ही वेळ आली. यापुढे सत्ताधाऱ्यांचे समस्यांकडे लक्ष वेधून घेत वेळप्रसंगी आंदोलनाचीही भूमिका राहील, असे ते म्हणाले.




Advertisement
Advertisement