Published On : Fri, Dec 28th, 2018

लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्धः आ. शरद रणपिसे

काँग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा

मुंबई : काँग्रेस पक्षाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त केले व देशात लोकशाहीची बीजे रोवून ती बळकट केली. पण विद्यमान भाजप सरकार देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला पराभूत करून देशाचे संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे यांनी केले.

काँग्रेस पक्षाच्या 134 व्या स्थापनादिनामित्त आज महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय टिळक भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. रणपिसे बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिन बी. एम. संदीप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ते पुढे म्हणाले की, विद्यमान सरकारच्या काळात देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. जाती- जातीत, धर्मा-धर्मात तेढ वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. राजकीय फायद्यासाठी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दलित, अल्पसंख्यांक समाजावर हल्ले केले जात आहेत. संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. या संकटाच्या काळात देशातील लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या देशासाठी बलिदान दिले आहे. त्याचप्रमाणे आता देशातील लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्राणाची बाजी लावतील असे आमदार रणपिसे म्हणाले.