Published On : Tue, Mar 19th, 2019

विशाल मुत्तेमवार यांना काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी

Advertisement

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींकडून आज अधिकृत घोषणा करण्यात आली. १९८० मध्ये चिमूर लोकसभा मतदार संघातून निवडून येऊन प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीची सुरवात करणारे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे विशाल हे सुपुत्र आहेत.

विशाल मुत्तेमवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रसार व प्रसिद्धी समितीचे सदस्य आहेत. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने चंद्रपूर शहर आणि जिल्हा प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यानंतर त्यांची प्रदेश पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नागपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविले आहे.

चंद्रपूरमध्ये काँग्रेसचेच वर्चस्व :
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. शांताराम पोटदुखे सलग चारदा खासदार म्हणून येथूनच निवडून आले. १९९८ आणि १९९९ मध्ये काँग्रेसचे नरेश पुगलिया यांनी हा मतदारसंघ जिंकला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा व वरोरा या चार तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात पुढाकार :
स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि माय करिअर क्लबचे संस्थापक असलेले विशाल मुत्तेमवार हे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात सक्रिय आहेत. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नागपूर, चंद्रपूर, अमरावतीसह विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार संधी, करिअर कौन्सिलिंग, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

नागपूर विमानतळावर होणार स्वागत :
विशाल मुत्तेमवार यांचे आज रात्री ९ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.