काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने महाराष्ट्रासह देशभरात त्यांच्याविरोधात आंदोलन केलं आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी देखील सावरकरांवरील भूमिका स्पष्ट करत राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहे. परंतु आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बलात्काराला राजकीय हत्यार मानणारे सावरकर प्रेरणास्थान कसे असू शकतात?, असं वक्तव्य करत शिवानी वडेट्टीवार यांनी खळबळ उडवून दिली आहे.
काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी ट्वीटवर एक व्हिडिओ शेयर केला असून त्यात बोलताना त्या म्हणाल्या की, विनायक दामोदर सावरकर यांनी बलात्काराला विरोधकांविरोधात राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला होता, ते सावरकर कुणाचे प्रेरणास्थानी कसे असू शकतात?, असा खोचक सवाल शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपचे लोक शाहू-फुले आणि आंबेडकरांच्या विचारांसाठी कधीही मोर्चा काढणार नाही, परंतु सावरकरांबाबत कुणी काही बोललं तर लगेच मोर्चा काढतात, असं म्हणत शिवानी वडेट्टीवार यांनी भाजप-शिंदे गटाला खोचक टोला हाणला आहे.
बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे ? pic.twitter.com/NAjdfowViC
— Shivani Wadettiwar (@SVW790) April 13, 2023
सावरकरांच्या विचारांची महिलांना भीती वाटत असेल कारण सावरकरांनी बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरण्यास सांगितलं होतं, असं म्हणत शिवानी वडेट्टीवार यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक शहरांमध्ये सावरकर गौरव यात्रा काढली होती. त्यावरून शिवानी वडेट्टीवार यांनी भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.