बिहार : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी त्यांचा जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. यामुळे याठिकाणी काँग्रेसची ताकद वाढली आहे. पप्पू यादव यांनी आज दुपारी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये आपल्या पक्षातील इतर नेत्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्यासह इतरांनी पप्पू यादव यांचं पक्षामध्ये स्वागत केले. पप्पू यादव यांनी मंगळवारी बिहारची राजधाना पाटणा येथे आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या सल्लामसलतीनंतर पप्पू यादव यांनी त्यांच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान पप्पू यादव हे बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. तसेच या मतदारसंघातून ते विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
लालू प्रसाद यादव यांची काल भेट घेतल्यानंकर पप्पू यादव हे आज दिल्लीत आले. तिथे आज दुपारी त्यांच्या पक्षाचं अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाले. तसेच त्यांना काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले आहे.










