नागपूर : जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत मंगळवारी (30 जुलै) भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
जातीय जनगणेच्या मुद्द्यावरून बोलत असताना, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधीं यांच्यावर निशाणा साधत त्यांची जात विचारली. ज्या लोकांना आपली जात माहित नाही, ते जातनिहाय जनगणनेची मागणी करतात,असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. काँग्रेस पक्षाने ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे.
नागपुरातही शहर (जिल्हा)काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपविरोधात निदर्शने करण्यात आली.शहरातील व्हेरायटी चौकात काँग्रेस आमदार विकास ठाकरे, काँग्रेस नेते नितीन राऊतसह पदाधिकारी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
यादरम्यान अनुराग ठाकूर यांच्या पुतळ्याला चप्पलने मारहाण करून जाळण्यात आले. तसेच मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजीही करण्यात आली.काही कार्यकर्त्यांनी येणारी वाहनेही अडवली.बसेस थांबवण्यात आल्या. त्यामुळे वातावरण चिघळले होते. यादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तसेच संसदेत कोणत्या व्यक्तीची जात विचारणे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.