Published On : Wed, Aug 2nd, 2017

पाठ्यपुस्तकात इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या अवमानजनक उल्लेखावरून विधानसभेत गोंधळ

Advertisement

Maharashtra Legislative Council
मुंबई: राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या पुस्तकात देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याविषयी अवमानजनक माहिती प्रकाशित केल्याच्या मुद्यावरून बुधवारी विधानसभेत जोरदार गोंधळ झाला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले की, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन्ही नेत्यांचे देशाप्रती मोठे योगदान आहे. इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा अणुचाचणी घडवून आणली.

पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या बांग्लादेश मुक्तीसंग्रामाचे नेतृत्वही त्यांनी केले. या लढाईनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा म्हणून केला होता. त्यांच्या कार्यकाळातील असे अनेक निर्णय खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहेत. स्व. राजीव गांधी हे डिजिटल इंडियाचे खरे जनक आहेत. त्यांनीच अनेकांचा विरोध पत्करून भारतात संगणक आणला. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. इतिहासाच्या पुस्तकातील या दोन्ही नेत्यांबाबत केलेले उल्लेख जाणीवपूर्वक प्रतीमा मलीन करण्याच्या हेतूने केल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधित पुस्तकातून सदरहू परिच्छेद वगळावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी लावून धरली.