मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी मैदान गाजवले आहे. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजानेही आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील वातावरण आणखी ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपुरात ३० ऑगस्टपासून ओबीसींचं साखळी उपोषण-
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला ठाम विरोध दर्शवला असून ३० ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ही घोषणा केली. या आंदोलनाला भाजप नेते आशिष देशमुख आणि आमदार परिणय फुके यांनीही पाठिंबा दिला असून सर्वपक्षीय ओबीसी आमदारांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारकडून लेखी आश्वासनाची मागणी-
डॉ. तायवाडे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्र्यांनी तातडीने चर्चेला बोलावावं आणि ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार नाही, याबाबत स्पष्ट लेखी आश्वासन द्यावं. सरकारने मागील भूमिका कायम ठेवली तर आम्हाला ताकद दाखवण्याची गरज नाही. मात्र मागण्या फेटाळल्या गेल्या तर हे आंदोलन साखळी उपोषणापुरतं मर्यादित राहणार नाही, तर आमरण उपोषणालाही आम्ही सुरुवात करू.”
जरांगेंच्या आंदोलनावर मौन-
मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावर विचारलं असता डॉ. तायवाडे यांनी भाष्य टाळलं. “त्यांचं आंदोलन त्यांचं प्रकरण आहे, त्यावर आम्ही काही बोलणार नाही,” असं ते म्हणाले. पण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास महासंघ ठाम विरोध करणार असल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.
एकीकडे मुंबईत मराठा समाजाचे हजारो बांधव जरांगे यांच्या नेतृत्वाखाली ठाम लढा देत आहेत, तर दुसरीकडे नागपुरात ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरू होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.