Published On : Wed, Aug 3rd, 2022

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे सर्व्हे करा…. पंचायत समितीच्या आढावा सभेत अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

हिंगणा : महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण बुडाला. बहुतेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात बांधावर जाऊन सर्व्हे करावे.झालेल्या पिकाच्या व इतर नुकसानीबाबत अहवाल शासनाला पाठवावा असे निर्देश पंचायत समिती च्या आज पार पडलेल्या आढावा सभेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व ग्रामसेवकाना देण्यात आले.

माहे जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे, रस्त्याचे, पुलाचे, विहिरीचे व इतर बाबीचे झालेल्या नुकसानीबाबत आज स्थानिक बचत भवनात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे व पंचायत समितीच्या सभापती रुपाली खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची आढावा सभा आयोजीत करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य लीलाधर पटले, शोभा आष्टणकर ,गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले, तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार, विस्तार अधिकारी आर बी बावणे, मंडळ कृषी अधिकारी रामू धनविजय आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेण्यात आला.कृषी अधिकारी कुंभार यांनी तालुक्यातील सर्व ४८ केंद्र अंतर्गत सर्व्हे केलेल्या गावांची माहिती दिली. उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून सुद्धा शेती,रस्ते ,पुलं, घरे तसेच इतर नुकसानीचा आढावा घेण्यात आला.पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त तीन दिवसाचा कालावधी मिळाला तो वाढवून देण्याची मागणी काही सरपंचानी केली.पांदण रस्त्याचा विषय सुद्धा चर्चेत आला होता. तालुक्यातील अनेक शेतात अजूनही पाणी साचले आहे, पिकं पिवळी पडली आहे या नुकसानीची केंद्रीय पथकाने पाहणी करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ठराव पाठवावा. सरसकट हेक्टरी १ लाखाची मदत शासनाने करावी. ही मागणी करण्यात आली.

कृषी विभाग व ग्रामसेवकानी टेबल सर्व्हे करू नका. अजूनही अहवाल सादर करायला अवधी आहे. प्रत्येक गावात दवंडी द्या व शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्व्हे करा असे निर्देश यावेळी देण्यात आले. या आढावा सभेला गावोगावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व कृषी सखी उपस्थित होत्या. ” *हर घर तिरंगा “अंतर्गत राष्ट्रध्वज वितरण* …. या आढावा सभेनंतर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्रामसेवकाना तिरंगा व राष्ट्रध्वज संहितेचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले