Published On : Thu, Aug 9th, 2018

नागपूर बंदला संमिश्र प्रतिसाद

Advertisement

नागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या ९ आॅगस्टच्या क्रांती ठोक मोर्चा आणि आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फिरून दुकाने बंद केली. त्यामुळे सीताबर्डी, महाल, इतवारी, गांधीबाग, मस्कासाथ, सक्करदरा या भागातील बाजारपेठा बंद होत्या. शिवाय शहर बस बंद असल्यामुळे प्रवाशांना फटका बसला.

सकाळी १० वा महाल गांधीगेट येथे महाआरतीनंतर आंदोलनाला सुरुवात झाली. तत्पूर्वी मेजर राणे, उमेश चौबे आणि काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी हजारो मराठा समाजबांधव आणि महिला उपस्थित होत्या. त्यांनी शासनाविरोधात नारेबाजी करून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.

राजे मुधोजी भोसले म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. युवकांना तसे आवाहनही करण्यात आले आहे. पुढील पिढी शिक्षित होण्यासाठी मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. शासनाने ठरविल्यास आरक्षण देण्यास काहीही अडचण नाही. यावेळी अन्य नेत्यांनी भाषण देऊ नये, अशी मागणी युवकांनी केली.

-चौकाचौकात धरणे आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी.
-आंदोलनाचा फटका शहरातील मुख्य बाजारपेठांना बसला. महाल, गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ, सराफा बाजार, सीताबर्डी, कॉटन मार्केट, सुभाष रोड या भागातील दुकाने सकाळी उघडली नाहीत.
-महालातील महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये पालकमंत्र्यांची पाणी प्रश्नावर बैठक सुरू असताना आंदोलक सभागृहाबाहेर धडकले आणि शासनाविरोधात नारेबाजी सुरू केली.
-आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा महिला कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा हातात घेऊन गांधीगेटपासून टिळक पुतळ्यापर्यंत आंदोलन आणि नारेबाजी केली. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला.
-आंदोलकर्त्या महिलांनी महाल, गणेशपेठ, सुभाष चौक या चौकात मानवी साळखी तयार करून ठिय्या आंदोलन केले आणिवाहतूक बंद पाडली.
-आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एसटी वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या. सकाळी एसटीची वाहतूक सुरू होती. गणेशपेठ येथील एसटी स्थानकातून बस बाहेर निघताच कार्यकर्त्यांनी चाकातील हवा सोडली. त्यामुळे एसटी वाहतूक बंद झाली.
-बहुतांश शाळांनी गुरुवारी सुटी जाहीर केली. शिक्षण विभागाने अधिकृत सुटी जाहीर केलेली नसून शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या अधिकारात सुटी दिली.
-आरक्षण मिळाले पाहिजे या मराठा समाजाच्या मागणीला भावसार, हलबा युवा समाज, मुस्लीम परिषदेसह अनेक समाजाने पाठिंबा आंदोलनाला पाठिंबा दिला.