Published On : Sat, Feb 16th, 2019

आयटीपार्क मार्गावरील ट्रंक लाईनचे काम १५ दिवसात पूर्ण करा : महापौर

Advertisement

लक्ष्मीनगर झोनमधील समस्यांच्या निराकरणासंदर्भात बैठक

नागपूर: लक्ष्मीनगर झोनमधील बंडू सोनी ले-आउट परिसरात छत्रपती संभाजी महाराज चौक ते आयटीपार्क मार्गालगत मागील दोन वर्षापासून ट्रंक लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. ट्रंक लाईनसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघाताची स्थिती निर्माण होत आहे. शिवाय परिसरातील नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे येत्या १५ दिवसात तातडीने हे काम पूर्ण करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत लक्ष्मीनगर झोनमधील दौऱ्यात निदर्शनास आलेल्या प्रलंबित समस्यांच्या निरसणासंदर्भात शुक्रवारी (ता.१५) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. बैठकीत अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती लहुकुमार बेहते, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका सोनाली कडू, मिनाश्री तेलगोटे, पल्लवी श्यामकुळे, उज्ज्वला बनकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, विजय हुमने, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (वाहतूक) आर.जी. बोदिले, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कनिष्ठ अभियंता एम.एस. सुरडकर यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत छत्रपती संभाजी महाराज चौक ते आयटीपार्क मार्गासह, त्रिमूर्ती नगर मटन मार्केट व संचयनी कॉम्प्लेक्सबाबतच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज चौक ते आयटीपार्क मार्गावरील ट्रंक लाईनच्या प्रलंबित कामामुळे या मार्गावरील सिमेंट रोडचे कामही बंद आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीचाही मोठा त्रास सहन करावा लागतो. ट्रंक लाईनसाठी रस्त्यावर मोठे खड्डे खणण्यात आले आहेत. मात्र या खड्ड्यांच्या सभोवताल कोणत्याही प्रकारचे बॅरिकेडस् लावण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबतही बेजाबदारपणा बाळगण्यात येत आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत छत्रपती संभाजी महाराज चौक ते आयटीपार्क मार्गावरील कामाची पाहणी करून येत्या १५ दिवसात काम पूर्ण व्हावे, याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

संपूर्ण शहरातील मटन मार्केटबाबत धोरण तयार करा : महापौर नंदा जिचकार
शहरातील विविध भागात असलेल्या मटन मार्केटमधील घाण हा संपूर्ण शहरातील प्रश्न आहे. नागरिकांची सुविधा व विक्रेत्यांच्या व्यवसायासंदर्भात योग्य निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण शहरातील मटन मार्केटबाबत लवकरात लवकर धोरण तयार करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

त्रिमूर्ती नगर येथील नाल्यालगतच्या मटन मार्केटबाबत नागरिकांचा रोष वाढत आहे. विक्रेत्यांकडून नाल्यालगत थाटण्यात आलेल्या दुकानांमध्येच कत्तल करण्यात येत असल्याने परिसरात घाण पसरविली जात आहे. अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून यावर ठोस कार्यवाही होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मटन मार्केट हटविणे आवश्यक आहे. संपूर्ण शहरात हीच परिस्थिती असून यासाठी प्रत्येक झोनस्तरावर मटन व मच्छी मार्केट आणि कत्तलखाना तयार करण्याची योजनाही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी मांडली.

नागरिकांचा वाढता रोष व त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्रिमूर्ती नगर येथील मटन मार्केट हटवून त्यांच्या तात्पुरत्या व्यवस्थेबाबत सर्व्हे करून व्यवसायासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले. त्रिमूर्ती नगर येथील मटन मार्केटसह शहरातील संपूर्ण विक्रेत्यांच्या सोयीसाठी मनपा सदैव सकारात्मक विचार करीत आहे. मात्र यावर स्थायी स्वरूपाचे उपाय निघावे यासाठी विक्रेत्यांनीही सहकार्य करावे, आवश्यक त्या मदतीसाठी मनपा आपल्या सोबत आहे, असा विश्वासही महापौर नंदा जिचकार यांनी दिला.

संचयनी कॉम्प्लेक्स संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन कार्यवाही
खामला मार्गालगत असलेल्या निर्माणाधीन बंद इमारतीचे प्रकरण न्यायालयात असल्याने अनेक वर्षांपासून इमारतीच्या तळभागात पाणी साचले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात न्यायालयीन प्रकरण व निर्णयाचा कायदेशीर अभ्यास करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या इमारतीच्या तळभागात जमा होणारे पाणी अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मनपाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या इमारतीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेउन याबाबत लवकरात लवकर ठोस कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.