Published On : Thu, Nov 29th, 2018

शहरातील सुधारीत विकास आराखडा वेळेत पूर्ण करा !

Advertisement

स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांचे निर्देश

नागपूर : नागपूर शहरातील सुधारीत विकास आराखडा आवश्यक त्या सुधारणा करून वेळेत पूर्ण करून समितीपुढे सादर करा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.

गुरूवारी (ता. २९) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये विविध विषयावर बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांच्यासह उपसभापती रामकृष्ण वानखेडे, सदस्य भगवान मेंढे, राजकुमार साहु, पल्लवी श्यामकुळे, जितेंद्र घोडेस्वार, उपायुक्त राजेश मोहिते, नगर रचनाकार पी.पी. सोनारे आदी उपस्थित होते.

कोणत्याही शहराच्या विकासासंदर्भात शहराचा २० वर्षाचा विकास आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये मागील विकास आराखड्यातील आरक्षण तसेच इतर बाबींची माहिती दर्शविली जाणे आवश्यक असते. त्यानुसार नागपूर शहराचाही विकास आराखडा सुधारित करण्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा यावेळी स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी घेतला. नागपूर शहरामध्ये एकूण २२७ चौरस किमीची महानगरपालिकेची हद्द आहे. त्यानुसार जुन्या व नव्याने समावेश झालेल्या भागांचा सुधारित विकास आराखड्यात समावेश होणे आवश्यक आहे. त्यानुसार कारवाई करून वेळेत सुधारणा करून विकास आराखडा पूर्ण करण्याचे यावेळी सभापती संजय बंगाले यांनी निर्देशित केले.

यावेळी सभापती संजय बंगाले यांनी चालू आर्थिक वर्षात मनपाच्या नगर रचना विभागाला प्राप्त झालेल्या ऑनलाईन व ऑफलाईन बिल्डिंग प्लानची संख्या तसेच त्यांची डिमांड राशी व त्या मार्फत विभागाकडे प्राप्त झालेल्या उत्पन्नाची स्थिती जाणून घेतली. शासनाच्यावतीने टीओडी मध्ये सूट देण्यात आली असल्याने मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्या दृष्टीने टीओडी सूटची अंमलबजावणी करून बिल्डिंग प्लानद्वारे मनपाच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी दर १५ दिवसांनी याबाबत आढावा घेण्यात यावा, असेही निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले.

हजारीपहाड डीपी रोड तातडीने पूर्ण करा
हजारीपहाड येथे १८ मीटरचा डीपी रोड प्रस्तावित आहे. मात्र येथे अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणामुळे तो डीपी रोड रखडलेला आहे. मागील आठ वर्षापासून येथे असलेले हे अतिक्रमण डीपी रोडच्या मार्गामध्ये अडसर ठरत आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकाला धरमपेठ झोन कार्यालयाद्वारे येत्या १५ दिवसात नोटीस बजावून हे अतिक्रमण हटविण्यात यावे व १८ मिटर लांबीचा डीपी रोड तातडीने पूर्ण करण्यात यावा, असेही निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.