Published On : Wed, May 31st, 2017

पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छता कार्य पूर्ण करा

Advertisement


नागपूर: 
नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या नदी स्वच्छता अभियानाअंतर्गत नाग नदी, पोरा नदी, पिवळी नदीचे उर्वरित स्वच्छता कार्य पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. यासोबतच शहरातील पावसाळी नाल्यांतील अडथळे दूर करा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिलेत.

शहरातील नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण आणि स्वच्छता अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बुधवारी (ता. 31 मे) रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, आय़ुक्त अश्विन मुदगल, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, नेहरुनगर झोन सभापती भगवान मेंढे, धरमपेठ झोन सभापती रुपा रॉय, माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, अतिरिक्त आय़ुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, अति. आय़ुक्त रवींद्र कुंभारे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे यांच्यासह सर्व झोनचे सहायक आय़ुक्त, कार्यकारी अभियंता, विभागप्रमुख, आरोग्य झोनल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मनपाच्या सर्व झोनमधील नदी – नाले स्वच्छता, खोलीकरण, रुंदीकरण कार्याचा आढावा यावेळी अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. यावेळी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नद्यातून काढण्यात आलेला गाळ नद्यांच्या काठावर न ठेवता स्थलांतरीत करण्यात येईल यावर चर्चा करुन उपाययोजना कऱण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावेळी मनपा झोन सभापतींनी नदी स्वच्छता अभियानांतर्गत काढलेला गाळ नदीच्या काठावर ठेवण्यात आला असल्याचे कार्यकारी महापौरांच्या निदर्शनात आणून दिले. यावर आवश्यक मनुष्यबळ किंवा मशिनरीसाठी अधिकाऱ्यांनी अर्ज करुन पावसाळ्यापूर्वी सर्व कार्य पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश कार्यकारी महापौरांनी दिलेत. या नदी स्वच्छता अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती, तसेच उर्वरित कामांची माहिती संबंधित झोन सभापतींना आणि नगरसेवकांना देण्यात यावी, अशा सूचना माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी केल्या. शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या सीमेंट मार्गाच्या बाजूला असलेल्या पावसाळी नाल्यांना मोकळे करण्याच्या सूचना कंत्राटदारांना करण्यात याव्या, अशी सूचना आऱोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी केली. रस्त्यावरील अनेक मेन होलवरील झाकणं तुटलेली आहे, ती तातडीने बदलविण्याची सूचनाही यावेळी सभापतींनी केली.

यावेळी आय़ुक्त म्हणाले, शहरातील पावसाळी नाल्यांमधील अडथळे वेळेत मोकळे केल्यास रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा मिळू शकेल. शिवाय सांडपाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावसाळी नाल्यांचे मार्ग त्वरित बंद करण्यात यावे जेणेकरुन या नाल्यातून फक्त पावसाळी पाणीच जाईल. अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पावसाळी पाणी साठा होत असलेल्या 98 स्थळांवर लक्ष केंद्रीत केल्यास या पावसाळ्यात समस्या उद्भवणार नसल्याचे सांगितले.

मनपा लावणार 45 हजार रोपटे

‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या घोषवाक्यसह शहरात वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ही योजना नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणार आहे. यावर्षी महानगरपालिका 45 हजार रोपट्यांचे वाटप करणार असून याची उपलब्धताही करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत उद्यान अधीक्षक सुधीर माटे यांनी दिली. या उपक्रमात सर्व झोनचे सभापती, नगरसेवक आणि समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रभावी अंमलबजावणी करता येईल याबद्दल सविस्तर नियोजन अहवाल पुढील बैठकीत सादर करावा अशा सूचना यावेळी कार्यकारी महापौरांनी केल्या. शहरातील विविध परिसरात लावण्यात येणाऱ्या रोपट्यांच्या ट्री-गार्डवर ज्याच्या घरासमोर रोपटे लावत आहे, त्यांची नावे पालक म्हणून लिहावी व त्यांच्या हस्तेच वृक्षारोपण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी झोन सभापतींनी केल्या.