Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 4th, 2017
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  प्रगतीपथावर असलेली कामे जलदगतीने पूर्ण करा : महापौर

  नागपूर: नागपूर महानगरपालिकेंतर्गत शहरात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची उर्वरित कामे जलदगतीने करा, असे निर्देश देत, त्यात कुठलीही दिरंगाई चालणार नाही, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला दिला.

  मनपाच्या विविध प्रकल्प आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, अप्पर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, मुख्य अभियंता उल्हास देबडवार उपस्थित होते. नागपूर महानगर पालिकेच्या अर्थसंकल्प २०१२-१३ मध्ये मनपा सभागृहाने ज्या प्रकल्पांना मान्यता दिली होती, ते सर्व प्रकल्प प्रशासनाने जलदगतीने पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने कार्य करण्याच्या सूचना महापौर नंदाताई जिचकार यांनी दिल्या. हे प्रकल्प सुरू झाल्यास मनपाला मोठया प्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकतो,असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

  सध्या प्रगतीपथावर असलेल्या सर्व प्रकल्पांबाबत माजी महापौर प्रवीण दटके यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मनपाद्वारे चालणाऱ्या प्रकल्पामध्ये क्वेटा कॉलनी येथील देवाडिया दवाखाना विकासाअंतर्गत अत्याधुनिक हॉस्पीटलचे निर्माण, रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहाचे निर्माण,केळीबाग रोड महाल येथील बुधवार बाजाराचा बी.ओ. टी. तत्त्वावर विकास करणे, बुधवार बाजार सक्करदरा येथे बाजारासह शॉपिंग मॉल व सामाजिक सभागृह निर्मिती, सोक्ता भवन गांधीबाग येथे वाणिज्यिक संकुलाचे बांधकाम, वाठोडा येथे क्रीडा संकुलाची निर्मिती, वाठोडा येथे सुरु असलेले कमर्शियल कॉम्प्लेक्सचे बांधकाम, अंबाझरी उद्यान, मनपाच्या प्रशासकीय इमारती इत्यादी बांधकामाचा आढावा महापौरांनी घेतला.

  कस्तुरचंद पार्क येथे मनपा व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येण्याऱ्या देशातील सर्वात उंच तिरंगा उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च २.५० कोटी असून या प्रकल्पाच्या निविदा तयार करण्यात आलेल्या आहेत. वाठोडा येथे उभारण्यात येणाऱ्या कौशल्य विकास विद्यापीठ व व्यवस्थापन केंद्राचे प्रथम टप्प्याचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. सोमलवाडा, खामला, जयताळा येथे होणाऱ्या ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पाची किंमत ३५०० कोटी रुपये इतकी आहे. हा प्रकल्प मनपातर्फे विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. ज्यामुळे मनपास भरीव उत्पन्न प्राप्त होऊ शकेल, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक लवकरच रामकृष्ण मिशन यांच्याकडे हस्तांतरीत करणार असल्याची माहितीही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. सुरेश भट सभागृहाच्या प्रगतीबाबत सुद्धा आढावा घेण्यात आला. सदर प्रकल्प येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.

  घनकचरा व्यवस्थापन, जलमल शुद्धीकरण करण्याची कामे, जिंजर मॉल, दानागंज बी.ओ.टी.प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. शहरातील १,२६,००० पथदिवे हे एल. ई. डी.पथदिव्यांनी बदलविण्याचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे ६५ ते ७० टक्के ऊर्जाबचत होणार असून महापालिकेची ७५ कोटींची बचत होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल यांनी दिली. महापालिकेच्या सर्व कार्यालयीन इमारतीमधील सर्व दिवे तसेच सिलींग फॅन्स हे अनुक्रमे एल. ई. डी. व एफिशियंट फॅन्स ने बदलविण्याचे कामसुद्धा मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याद्वारे महापालिकेची ९२ लक्ष रूपयांची ऊर्जा बचत होणार आहे. या प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत २५० कोटी असून त्यातील ५० टक्के रक्कम राज्य शासनाच्या मेडा, पुणे या संस्थेमार्फत प्राप्त झाली आहे. उर्वरीत ५० टक्के खर्च महापालिका वहन करणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व इमारतीमध्ये, पथदिव्यांवर, पाणीपुरवठा केंद्रावर, सिवेज ट्रीटमेंट प्लांटस्‌वर होणाऱ्या ऊर्जेचा वापर पारंपरिक उर्जेवरून अपारंपरिक उर्जेवर होण्याचे दृष्टीने एकूण २७ मेगावॅट क्षमतेचे सौर संयंत्र या विविध ठिकाणांवर बसविण्याकरिता सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

  प्रगतीपथावर असलेल्या या सर्व प्रकल्पांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लवकरच भेट देतील आणि बांधकामाचा आढावा घेतील, अशी माहिती महापौर श्रीमती जिचकार यांनी यावेळी दिली. नागपुरातील प्रकल्पांसंदर्भात मुंबई येथे मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार असून त्या बैठकीसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

  बैठकीला अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, स्थावर अधिकारी आर.एस. भुते, उद्यान अधीक्षक सुधीर माटे आदी यावेळीउपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145