Published On : Sun, Jan 6th, 2019

प्रस्तावित प्रकल्पांची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : प्रवीण दटके समितीने घेतला प्रकल्पांचा आढावा

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न असलेले आणि नागपूरच्या विकासाला नवा आयाम देणारे शहरातील अनेक प्रकल्पांची शासकीय दप्तरी मंजुरीची प्रक्रिया किंवा अन्य बाबी तातडीने पूर्ण करून पुढील महिन्यापर्यंत भूमिपूजनासाठी सज्ज ठेवा. सर्व प्रस्तावित प्रकल्पांची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर पूर्ण करा, असे निर्देश बी.ओ.टी., पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या प्रवीण दटके समितीच्या बैठकीत महापौर नंदा जिचकार व समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सदर विशेष समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसेवक प्रमोद चिखले उपस्थित होते.

सदर बैठकीत महापौर नंदा जिचकार आणि समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली. सीमेंट काँक्रीट रस्ते टप्पा १, २ व ३ मधील पूर्ण झालेली कामे आणि अपूर्ण कामांची सद्यस्थिती, मंजूर कामे सुरू होणार असल्याचा कालावधी जाणून घेत मंजूर झालेली आणि कार्यादेश मिळालेली कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. सीमेंट रोड बांधकामानंतर जंक्शन निर्मितीची कामे रखडली आहेत. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करून संपूर्ण जंक्शन तातडीने करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

नागपूर शहरातील संपूर्ण जुने पथदिवे एलईडी मध्ये परावर्तीत करण्याच्या कामातील अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यानंतर आता केलेल्या नियोजनाबाबतची माहिती महापौर नंदा जिचकार व समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी घेतली. झोननिहाय एलईडी किती लावण्यात आले, याची आकडेवारी कार्यकारी अभियंत (विद्युत) संजय जैस्वाल यांनी दिली. मे महिन्यापर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. डिक दवाखाना धरमपेठ, आयसोलेशन हॉस्पीटल, नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत मोक्षधाम घाटाचा पुणे शहराच्या धर्तीवर विकास प्रकल्प, बुधवार बाजार, महाल आणि सक्करदरा, शहरातील प्रकल्पांच्या अनुषंगाने मेट्रो रेल कॉर्पोरेशन, नागपूर आणि महानगरपालिका यांच्यामध्ये झालेल्या करारासंबंधीचा पाठपुरावा आणि त्याचा आढावा महापौरांनी घेतला. संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट या प्रकल्पांचे हस्तांतरण मेट्रोला झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे स्थानकासमोरील पूल, यशवंत स्टेडियम, महाल येथील बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक व सांस्कृतिक स्मारक, चिटणीसपुरा येथील शाहू वाचनालय, टाऊन हॉल, झोन क्र. ६ ची नवीन इमारत, महाल दवाखाना या प्रकल्पांची कामे तातडीने निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पांतर्गत जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशनला लागून मेट्रो मॉल प्रस्तावित आहे. त्याचे भूमिपूजनही १९ जानेवारी रोजी प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्याही सर्व प्रक्रिया पूर्ण करा. महामेट्रो, नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी महापौर नंदा जिचका यांनी दिले.

बैठकीला अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.