नागपूर : पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील सर्व भागात मान्सूनपूर्व कामे सुरु करावी व ती लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी दिले.
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्तांनी बुधवारी (ता.१४) आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त (उद्यान) श्री. गणेश राठोड, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कनिष्ठ अभियंता श्री. भस्मे, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, शाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेंभुर्णे आदी उपस्थित होते.
पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरणारी झाडे, विद्युत खांब तसेच तारांवर लोंबकळणाऱ्या फांद्या यामुळे मोठा धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे अशी सर्व झाडे लक्षात घेउन त्यांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी. विद्युत विभागाने देखील प्रकाश व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. याशिवाय मनपाद्वारे समाज विकास विभागाच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी निवारा केंद्र तयार करण्यात आलेली आहे. या सर्व केंद्रांमध्ये देखील व्यवस्था सज्ज करण्यात यावी. पावसाळ्यात रस्त्यावर राहणारे बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना निवारा गृहामध्ये आसरा देण्यात यावा. शहरातील पूरस्थिती उद्भवल्यास संभाव्य धोक्याच्या अनुषंगाने आपात्कालीन स्थितीत नागरिकांच्या सुविधेसाठी मनपाच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मनपाच्या शाळा देखील सज्ज ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी दिले आहेत.
सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करुन मान्सूनपूर्वी सर्व व्यवस्थेसंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्याची सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी यावेळी केली.