
नागपूर,: नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या नदी-नाले सफाई अभियानाला अधिक गती देत ३० एप्रिलपूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि मशिनरीचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापौरांनी विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड,स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर,आयुक्त डॉ.विपीन, आरोग्य समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, मुख्य अभियंता श्री.मनोज तालेवार, उपायुक्त श्री. राजेश भगत, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.गजेंद्र महल्ले यांच्यासह संबधित झोनचे नगरसेवक, सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता, झोनल स्वच्छता अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
महापौरांनी शहरातील विविध झोनमधील नाले, घाट आणि पाण्याचा प्रवाह अडथळामुक्त करण्याच्या कामांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा तसेच अडथळे तातडीने हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यावर त्यांनी भर दिला. महापौरांनी तब्बल ७ तास पेक्षा अधिक दौरा करून नदी-नाले स्वच्छतेची परिस्थिती जाणून घेतली.
महापौरांनी त्रिमूर्तीनगर येथील नाल्याच्या बाजूला असलेल्या मटन मार्केटचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले.तसेच नागरिकांना नाल्या आणि नदी मध्ये कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश घनकचरा विभाग व सहायक आयुक्तांना दिले.त्यांनी अंबाझरी दहन घाट व विवेकानंद स्मारक ची पाहणी करतांना नदी मध्ये येणारी जलपर्णी बाबत चिंता व्यक्त करीत यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.त्यांनी गोरेवाडा तलाव जवळ तेथील छठ पूजेच्या ठिकाणी सीवर लाईन पाणी रोखण्याचे निर्देश दिले.तसेच ज्या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्याचे काम अत्यंत आवश्यक आहे. तेथे भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. महापौरांनी नारा घाट जवळील नदीवर संगम मोकळा करण्याचे निर्देशित केले. श्रीमती मनीषा अतकरे यांनी संगम पुनापूर येथील नदी-नाले बद्दल समस्या सांगितल्या. त्यांनी सांगितले की,पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते, लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.महापौरांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मनपा सोबत काम करून महालगाव कापसीच्या पुढे नदीचा पात्र ५० मीटर पर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले.
सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र बोरकर यांनी पावसाळ्यात नागरिकांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये, याकरिता उपाय करण्याचे निर्देश दिले.महापौरांनी नरसाळा परिसरातील गारगोटी भागातील नागरिकांना पावसाळ्यात होणाऱ्या समस्ये बद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. आणि टेक ऑफ सिटीच्या विकासाला नोटीस देणे तसेच गेल्या पावसात खचलेल्या नाल्यावरच्या पुलाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. श्री नरेंद्र बोरकर आणि शिक्षण सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा यांनी , डिप्टी सिग्नल परिसरातील समस्येची माहिती दिली. महापौरांनी वनदेवी नगरात नागरिकांशी चर्चा करून त्यांना पावसाळ्या दरम्यान होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती प्राप्त करून घेतली.
पाहणी दौऱ्याची सुरुवात लक्ष्मीनगर झोन मधील सहकार नगर घाट येथून करण्यात आली. त्यानंतर जयताळा येथील नवग्रह मंदिराजवळील नाला, नागोबा मंदिर परिसर, त्रिमूर्ती नगर नाला यांची पाहणी करण्यात आली. तर धरमपेठ झोन मधील अंबाझरी घाट तसेच फुटाळा ते रविनगर मार्गावरील भरतनगर परिसरातील नाल्यांचीही तपासणी करण्यात आली. यानंतर एनसीसी नाल्यापासून मदर डेअरी (WCL) पर्यंतच्या भागाचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी झोन मधील गोरेवाडा घाट, बोरगाव नाला, अनंतनगर येथील नाले तसेच गिरिजा अपार्टमेंट परिसरातील स्थितीची पाहणी करण्यात आली. नारा घाट व वनदेवी नगर परिसरातील कामांचाही आढावा घेण्यात आला. नंतर अशीनगर झोन मधील वांजरा परिसर, लक्ष्मीनगर नाला, शंभू नगर नाला याठिकाणीही महापौरांनी कामांची पाहणी केली. लकडगंज झोन मधील संगम पुनापूर, डिप्टी सिग्नल परिसर, मिनी माता नगर नाल्यांची स्थिती तपासण्यात आली. नेहरूनगर झोन मधील सेंट झेव्हियर परिसर, दर्शन कॉलनी, सेव्हन स्टार हॉस्पिटलजवळील नाला तसेच जगनाडे चौक परिसरातील हत्ती नाला आणि गंगाबाई घाट पुलाची पाहणी करण्यात आली. गांधीबाग झोन मधील अशोक चौक,हनुमान नगर झोन येथील गारगोटी नाला, नरसाळा घाट आणि मानेवाडा घाट परिसरातील कामांची तपासणी करण्यात आली. तसेच हनुमान नगर झोन मधील नरसाळा घाटची पाहणी करण्यात आली.
वेळेत काम पूर्ण करण्यावर भर
महापौरांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पूर्ण सफाई झाल्यास शहरात पाणी साचण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. नदी-नाले सफाई अभियान प्रभावीपणे राबवून नागरिकांना दिलासा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.










