Published On : Thu, May 3rd, 2018

शासनाकडे प्रलंबित असलेले सर्व प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावा : प्रवीण दटके

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी., पी.पी.पी. तत्त्वावरील केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले सर्व प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले. गुरूवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत प्रवीण दटके समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत ते बोलत होते.

यावेळी स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, समिती सदस्य संजय बंगाले, पिंटू झलके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, मुख्य अभियंता मनोज तालेवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी माजी महापौर प्रवीण दटके यांनी महानगरपालिकेचे प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यामध्ये ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, बुधवार बाजार (महाल व सक्करदरा), महाल दवाखाना, डिक दवाखाना, दहन घाट, मोक्षधाम पूल, स्व. बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक प्रकल्प, डी.पी.रस्ते यांचा समावेश होता.

मोक्षधाम पुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने प्रवीण दटके यांनी नाराजी व्यक्त केली. १ जूनला कोणत्याही परिस्थितीत तो पुल सुरू करण्यात यावा आणि महापौरांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाल बुधवार बाजाराच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. बुधवार बाजाराच्या तळघरात भव्य पार्किंगची सोय करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तेथील व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबतही यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीला उपअभिंयता शकील नियाजी, राजेश दुफारे, बाजार अधीक्षक मदन सुभेदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.