Published On : Mon, Aug 10th, 2020

जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी वेबिनार,हेल्प डेस्कच्या माध्यमातून महावितरणचे तक्रार निवारण

२१ हजार तक्रारीचा निपटारा

नागपूर: महावितरणच्या नागपूर ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात आले होते.

यानुसार नागपूर जिल्ह्यात ४२ वेबिनार घेऊन सुमारे २१ हजार पेक्षा अधिक वीज ग्राहकांशी संवाद साधण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली. सोबतच नागपूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी ठिकाणी तक्रार निवारण मेळावे मागील २ महिन्यात घेण्यात आले. महावितरणच्या मौदा विभागात ३४, सावनेर विभागात ५०, उमरेड विभागात ३० , काटोल विभागात ३७ ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी “हेल्प डेस्क ” सुरु करण्यात आले होते. मौदा विभागात ४८४१, उमरेड विभागात ६०४८, सावनेर विभागात सर्वाधिक ७,१६०,काटोल विभागात ३,६५८ वीज ग्राहकांनी यात आपल्या तक्रारी मांडल्या. या सर्व तक्रारी दूर करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विदर्भातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानंतर ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. , मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल वीज ग्राहकांना देण्यात आले . या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करून शंका निरसन करण्यात आले. महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-19 संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणची माहिती देण्यासाठी समाज माध्यमाचा वापर करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ३३ वॉट्सअँप समूह तयार करण्यात आले आहेत.असेही अधीक्षक अभियंता आमझरे यांनी सांगितले.