Published On : Tue, Apr 28th, 2020

नागपुरात साकारणार आता ‘कम्युनिटी मार्केट’

Advertisement

महापौर संदीप जोशी यांची संकल्पना : शेतकऱ्यांकडून थेट मिळणार माफक दरात ताजा भाजीपाला

नागपूर: भाजी बाजारात होणारी गर्दी, स्पष्ट निर्देश असतानाही नागरिकांकडून होणारी सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली आणि लॉकडाऊनमुळे जादा दराने मिळत असलेला भाजीपाला या सर्व समस्यांवर आता रामबाण उपाय मिळाला आहे. महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ची अभिनव संकल्पना मांडली असून यामाध्यमातून आता थेट शेतकऱ्यांकडून माफक दरात ताजा आणि उत्तम दर्जाचा भाजीपाला, फळे नागरिकांना त्यांच्या घरासमोरच उपलब्ध होणार आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही अभिनव संकल्पना दीनदयाल थाली आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ‘कम्युनिटी मार्केट’ या संकल्पनेतून साकारण्यात येणारा पहिलावहिला भाजीबाजार आठ रस्ता चौकातील पूर्व लक्ष्मीनगरमधील मैदानात गुरुवार ३० एप्रिलपासून नागरिकांच्या सेवेत येणार आहे. सकाळी ६ ते ८.३० या वेळेत नागरिक अगदी माफक दरात ताजी भाजी घेऊ शकेल, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना उत्तम दर्जाची व माफक दरातील भाजी व फळे घेण्यासाठी घरापासून दूर जावे लागते. तेथे गर्दीमुळे सामाजिक अंतर पाळले जात नाही. नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका बळावण्याची शक्यता अधिक असते. दारावर आलेल्या विक्रेत्याकडून महागात भाजी व फळे विकत घ्यावी लागतात. ह्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आता महापौर संदीप जोशी यांनी ‘कम्युनिटी मार्केट’ ही अभिनव संकल्पना मांडली. यासंदर्भात मंगळवारी (ता. २८) मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषि उपसंचालक नागपूर विभाग अरविंद उपरिकर, उपायुक्त (बाजार) महेश मोरोणे, बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य यांच्यासह अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

काय आहे ‘कम्युनिटी मार्केट’
कम्युनिटी मार्केट ही संकल्पना ठराविक परिसरातील नागरिकांसाठी मांडण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कॉटन मार्केटसारखे मुख्य मार्केट बंद झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली. ज्या भाज्या नागरिकांना मिळत आहे, त्यांचा दर्जाही उत्तम नाही आणि दरही चढलेले आहेत. यावर मात करण्यासाठी तीन चार वस्त्या, परिसर वा प्रभाग मिळून एक छोटासा भाजीपाला बाजार तयार करून थेट विक्रेता व ग्राहक यांचा संपर्क करून देण्यात येत आहे. यामुळे नागपूरच्या जनतेला घराच्या अगदी जवळ, माफक दरात उत्तम दर्जाची भाजी व फळे मिळतील, ही यामागील संकल्पना असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

पाळावे लागतील हे नियम
नागपुरातील पहिले ‘कम्युनिटी मार्केट’ पूर्व लक्ष्मीनगरमधील मैदानात सुरू होतेय. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातील अन्य भागातही ते सुरू होईल. मात्र या मार्केटमध्ये लॉकडाऊनसाठी असलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. ‘कम्युनिटी मार्केट’मध्ये येताना चेहऱ्यावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील. या नियमांचे पालन होते की नाही यासाठी स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. अर्थात हा संपूर्ण उपक्रम लॉकडाऊनच्या काळात नियोजनबद्धरीत्या राबविण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement