मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे दिल्लीत हरियाणा भवनमध्ये मुस्लीम धर्मगुरूंशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांच्यासह इतर अनेक मुस्लीम धर्मगुरू सहभागी होत आहेत. या घडामोडीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांचा सूर-
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, सरसंघचालक जर मुस्लिम समाजाशी थेट संवाद साधत असतील, तर हे स्वागतार्ह आहे. मात्र, जे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये धर्माच्या नावावर सतत विष पसरवत आहेत, त्यांना त्याच विषामुळे संपायची वेळ येईल.
ते पुढे म्हणाले, देशात आणि समाजात फुट पडू नये. सर्वांच्या अडचणी समजून घेऊन त्या सरकारसमोर मांडल्या पाहिजेत. नागरिकांना त्यांच्या हक्कांचं संरक्षण मिळालंच पाहिजे. मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो.
बैठकीत कोण उपस्थित?
या बैठकीत मोहन भागवत यांच्यासह संघाचे वरिष्ठ नेते दत्तात्रय होसाबळे, कृष्ण गोपाळ, रामलाल आणि इंद्रेश कुमार हेही सहभागी होत आहेत. ही बैठक संघाच्या शताब्दी वर्षातील संवाद अभियानाचा एक भाग मानली जात आहे. विविध धर्मातील समाजगटांशी थेट संवाद साधून विश्वास वाढवण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचं या बैठकीतून दिसून येत आहे.
याआधीही, सप्टेंबर २०२२ मध्ये भागवत यांनी मुस्लीम बुद्धिजीवी आणि धर्मगुरूंशी संवाद साधला होता. संघाने शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विचारधारा पोहोचवण्याचा आणि संवाद-सहकार्य वाढवण्याचा संकल्प केला आहे. विविध धर्मांमधील संवाद आणि सहकार्याचा हा प्रयत्न राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी याला दिलेले समर्थन या चर्चेला अधिक गती देण्याची शक्यता आहे.