Published On : Tue, May 18th, 2021

खाजगी रुग्णालयांबाबत तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समिती गठीत

Advertisement

मनपा आयुक्तांनी केले आदेश निर्गमित

नागपूर : खाजगी रुग्णालयांतर्फे कोरोना बाधित रुग्णांचे उपचार करताना ‍विहीत दरापेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे तज्ज्ञ लोकांची एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. समिती कोव्हिड रुग्णांच्या उपचार करताना विहीत दरापेक्षा जास्त दर आकारण्याची तक्रार झाल्यानंतर तीन दिवसाचे आत बिलाची तपासणी करुन आपले अभिप्राय सादर करेल. समिती गठीत करण्यासंबंधी आदेश मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी मंगळवारी (१८ मे) रोजी निर्गमित केले.

शहरातील लोकप्रतिनिधी, रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक यांचेकडून महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांना सतत तक्रार प्राप्त होत होत्या. त्यांनी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांना तक्रारीचे निराकरण करण्यासाठी समिती गठित करण्याची सूचना केली. आयुक्त यांनी खाजगी रुग्णालयात कोव्हिड रुग्णाचा उपचारादरम्यान होत असलेल्या अधिकच्या देयक आकारणी संदर्भातील तक्रारीचे तातडीने निराकरण करुन अनुषंगीक कार्यवाही करण्यासाठी समिती गठीत केली आहे. समिती आपला अहवाल अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांच्याकडे सादर करेल.

समितीमध्ये डॉ.निसवाडे (सेवानिवृत्त अधिष्ठाता) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, डॉ.मिलिंद भुरसुंडी, सेवानिवृत्त virologist, डॉ. शेलगावकर, Anesthetist, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, डॉ. हर्षा मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, म.न.पा.नागपूर, श्री. संजय वेनोरकर, सहायक लेखाधिकारी, महालेखाकार, लेखापरीक्षा कार्यालय, नागपूर, श्री. संजय मटलानी, सहायक लेखाधिकारी, उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क कार्या. नागपूर, श्री. प्रशांत गावंडे, सहायक लेखाधिकारी, सहसंचालक लेखा व कोषागार, नागपूर, श्री. निर्भय जैन, उपायुक्त (सा.प्र.वि.) महानगरपालिका, नागपूर, श्री. महेश धामेचा, सहा.आयुक्त (साप्रवि) म.न.पा.नागपूर यांचा समावेश आहे.

सध्याच्या कोरोनाच्या या संकटामध्ये वैद्यकीय चमू अहोरात्र सेवा देत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र काही रुग्णालय याचा संधी म्हणून उपयोग घेत आहेत. जास्त दर आकारल्याने रुग्णांच्या परिवाराचा होणारा त्रास रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने घेतलेला हा महत्वपूर्ण पुढाकार आहे. येणा-या तक्रारीवर ७२ तासाच्या आत कार्यवाही करणे ही या समितीची जबाबदारी राहणार आहे. ७२ तासात तक्रारीचे निराकरण करून त्याची सूचना मनपा आयुक्तांना देणे व आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून तातडीने कारवाई व्हावी, अशी या समितीकडून अपेक्षा आहे. नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी प्राप्त झाल्या या सर्व तक्रारींचे निराकरण या समितीकडे तक्रार करून होउ शकणार आहे. कोरोना उपचारात खासगी रुग्णालयामध्ये आपल्यासोबत अन्याय झालेला आहे, अशी भावना असलेल्या सर्व नागरिकांनी या समितीकडे आपली तक्रार करावी. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, अंकेक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व मनपातील अधिकारी सुद्धा असल्याने यामध्ये सर्वांच्या शंकेचे नि:पक्षपणे निराकरण केले जाईल यादृष्टीने समिती कार्य करेल, अशी ग्वाही महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे.

यासोबतच नागरिकांच्या सुविधेसाठी गठीत समितीने योग्यरित्या कार्य करावे, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना केली आहे.