नागपूर : नागपूर महानगरपालिका नागपूर शहराची पालकसंस्था म्हणून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य यासह अनेक क्षेत्रांमध्ये काम करीत आहे. नागरिकांना उत्तम सेवा मिळाव्यात, पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी यासाठी मनपा नेहमी प्रयत्नशील आहे. मनपा आणि केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरूवारी १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण झाले. यावेळी मनपा अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना ते संबोधित करीत होते. प्रारंभी त्यांनी मनपाच्या अग्निशमन जवानांच्या परेडचे निरीक्षण केले व विभागाच्या जवानांच्या तीन तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली.
कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री.अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, मिलिंद मेश्राम, डॉ. गजेंद्र महल्ले, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, भारत देश आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लवकरच देश ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. यात नागपूर शहराचे देखील योगदान असणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनपाचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अमृत-२, ई बसेस, मनपा शाळेतील मुलींसाठी शिष्यवृत्तीची योजना या कल्याणकारी योजनांसह केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना मनपाद्वारे राबविण्यात येत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून नागरिकांना सुविधा प्रदान करण्यात येत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मनपामध्ये २६३ प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली असून इतरांनाही लवकरच नियुक्ती देण्यात येणार आहे. शहराची पालकसंस्था म्हणून विविध माध्यमातून नागरिकांना सेवा पुरविण्यास कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देखील यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसे, गणेश राठोड, हरीश राऊत, अशोक घारोटे, विजय थूल, प्रमोद वानखेडे, नरेंद्र बावनकर, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, जितेंद्र गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपात वृक्षारोपण
राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत ‘एक पेड मा के नाम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री.अजय चारठाणकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मनपा कर्मचाऱ्यांनी सादर केले ‘देखों वीर जवानों’
स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत मनपा मुख्यालयात ‘तिरंगा कॉन्सर्ट’चे आयोजन करण्यात आले. व्ही5 एंटरटेनमेंट स्टुडिओ यांच्या सहकार्याने मनपा कर्मचाऱ्यांनी ‘देखो वीर जवानों’ या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात बहारदार प्रस्तुती केली. कार्यक्रमात अभियंता नितीन झाडे, आशिष उसरबासे, जवाहर नायक, पुष्पा जोगे, सुभाष बैरीसास, प्रकाश कलसिया, कमलाकर मानमोडे, धीरज शुक्ला, भूपेंद्र तिवारी आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांची प्रस्तुती केली.