नागपूर : भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे धंतोली येथील तुलस्यान हाउस, हुंडई शोरूम जवळ, घाट रोड येथे भिक्षेकरी निवारागृह बांधण्यात आलेला आहे. या निवारागृहाचे उद्घाटन बुधवार, दि. २७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता मा. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग भारत सरकार यांच्या मार्फत भिक्षेकरी मुक्त शहर करण्याबाबत राष्ट्रीय स्तरावर मोहिम राबविण्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर देशातील १० शहरांची (महानगरपालिका) निवड करण्यात आली आहे. या १० शहरांच्या यादीमध्ये नागपूर महानगरपालिकेचा समावेश आहे.
मनपातर्फे नागपूर शहरातील भिक्षेकऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. सदर सर्व्हेक्षणात १६०१ भिक्षेकरी व्यक्ती रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मिठा निम दर्गा, राजाबक्शा मंदिर, शनि मंदिर, यशवंत स्टेडियम अशा विविध स्थळी आढळून आले. पहिल्या टप्प्यात १६०१ भिक्षेकऱ्यांपैकी १५० भिक्षेकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मनपाच्या समाज विकास विभागातर्फे तुलस्यान हाउस, हुंडई शोरूम जवळ, घाट रोड, धंतोली, नागपूर येथे भिक्षेकरी निवारागृह सुरू करण्यात येत आहे. या भिक्षेकरी निवारागृहाचे संचालन सह्याद्री ग्रामीण विकास बहुउद्देशीय युवक कल्याण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
निवारकेंद्रात भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींना निवारागृह, पुनर्वसन, स्वच्छता, अन्न, वस्त्र, बिछायत, वैद्यकीय सुविधा, समुपदेशन व शिक्षण इत्यादी मुलभूत सेवा उपलब्ध करून देणे व त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच सन्मानाने जीवन जगण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर विषय संवेदनशील असल्यामुळे ज्या संस्था भिक्षेकरी विषयाशी संबंधित आहे अथवा ज्या संस्था सदर विषयावर सेवाभावी स्वरूपात कार्य करण्यास इच्छुक आहे, अशा संस्थांनी भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्प कक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.