Published On : Tue, Apr 6th, 2021

कठिण काळात प्लाझ्मादानासाठी जास्तीत दात्यांनी पुढे या

‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद

नागपूर : शहरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी अधीक प्रभावी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या दात्यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढाकार घेण्याचे आवाहन आरबीडी प्लाझ्मा बँक व लाईफ लाईन ब्लड बँकेचे मेडिकल डायरेक्टर डॉ. हरिश वरभे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. आजचा विषय ‘कोव्हिड आर.बी.डी. प्लाझ्मादान, कोरोना व्हॅक्सीन, अँटीबॉडी टेस्टींग’ असा होता. या विषयावर संवाद साधतानाच त्यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

डॉ. हरिश वरभे पुढे म्हणाले, सध्याच्या घडीला प्लाझ्मा दान करणे खूप श्रेष्ठदान आहे. यामुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचविल्या जाते. अशा रुग्णांसाठी प्लाझ्मा संजिवनी आहे असा विश्वास दात्याला पटवून देणे महत्वाचे आहे. यासाठी जनजागृती, प्रबोधन आणि दात्याला प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. सोबतच शहरातील स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेतल्यास प्लाझ्मादानाच्या कार्याला नक्कीच हातभार लागू शकतो असेही ते म्हणाले.

प्लाझ्मा थेरेपीचा उपयोग करण्यासंदर्भात ते म्हणाले, सध्या कोरोना पुर्णपणे बरा करण्यासाठी कोणतीही औषध तयार झालेली नाही. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णाला लवकर बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी उपचार पध्दती आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला योग्य वेळेत योग्य डोस दिल्यास ते अधीक परिणामकारक ठरते. म्हणूनच कोणत्याही औषधीपेक्षा प्लाझ्मा थेरेपीचा उपचार कधीही चांगला आहे असे ते म्हणाले.

सध्याचा काळ कठीण आहे. त्यामुळे या कठीण काळात लोकांचे प्राण वाचविण्यासाठी, त्यांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी सर्व दात्यांनी पुढाकार घेत स्वत: कोणत्याही रक्तपेढीत किंवा ब्लड बँकेत जाउन प्लाझ्मा दान करावे सोबतच रक्तदान सुध्दा करण्याचे आवाहन डॉ. हरिश वरभे यांनी यावेळी केले.