Published On : Mon, Jun 28th, 2021

कडूनिंब तसेच अत्याधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांच्या लागवड व संवर्धनासाठी पुढे या : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

कडूनिंबाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून मान्यता मिळावी यासाठी मनपाचे भारत सरकारला पत्र


नागपूर : कडूनिंब हे बहुगुणी तसेच बहुपयोगी औषधी वृक्ष आहे. निंबाची पाने, फळे, साल याचे अनेक औषधी उपयोग आहेत. निंबाचे बहुगुण लक्षात घेता या वृक्षाचे संवर्धन व्हावे व पुढील पिढीला त्याचे महत्व कळावे या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने कडूनिंबाला ‘राष्ट्रीय वारसा वृक्ष’ म्हणून घोषित करावे, यासंदर्भातील ठराव सभागृहात मंजूर करून त्याबाबत राज्य शासनाला पत्र पाठवून कडूनिंबाच्या झाडाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय नागपूर शहरात साकारत असलेल्या ऑक्सिजन झोनमध्ये बहुतांशी कडूनिंबाच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. या कार्यात आपण सर्वांनी पुढाकार घेऊन कडूनिंबासह अत्याधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड व संवर्धनासाठी पुढे या, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले, भारत हा आधीपासून समृध्द राष्ट्र राहिला आहे. केवळ संस्कृती व संस्कार नव्हे तर विविध क्षेत्रात देशाने जगात आपला ठसा उमटवला आहे. आज सर्वच शास्वत विकासाबद्दल बोलत आहेत मात्र शास्वत विकासाची आपल्या देशाची पुरातन सभ्यता आहे. सर्वांच्या मांगल्याची संकल्पना आपली असून पर्यावरणाच्या दृष्टीने शास्वत विकास जगाला आपण दर्शविले आहे, असे सांगतानाच देशाचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या दौऱ्यात रशियाने त्यांच्याकडे बर्फाळ प्रदेशात लावायला पिंपळ रोपांची मागणी केली होती व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १० हजार पिंपळ रोप त्यांना दिल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला.

पिंपळ हा वृक्ष दिवसातील २४ तासांपैकी २२ तास ऑक्सिजन देतो. वृक्ष संवर्धन ही आपली परंपरा आहे. वृक्षतोड होऊ नये यासाठी पुरातन काळात वृक्षांना देवी देवतांशी जोडले गेले. वटपौर्णिमेला वडाची पूजा केली जाते. वड सुद्धा जास्तीत जास्त प्राणवायू देतो. याशिवाय कडूनिंबाचे महत्व अनेक आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या निमित्ताने नागपूर शहरामध्ये ७५ ऑक्सिजन झोन निर्माण केले जाणार आहेत.

या ऑक्सिजन झोनमध्ये बहुपयोगी निंबाच्या वृक्षांची अधिकाधिक लागवड केली जाणार आहे. कडूनिंबाचे महत्व लक्षात घेता या वृक्षाला ‘राष्ट्रीय वारसा वृक्ष’ म्हणून नागपूर महानगरपालिकेने घोषित करावे यासाठी मनपाच्या सभागृहात प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाचे सूचक सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे हे होते तर त्यास स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर व नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी अनुमोदन दिले. कडूनिंबाला ‘राष्ट्रीय वारसा वृक्ष’ मान्यता मिळावी या मागणी संदर्भात मनपा सभागृहातील मंजुरीच्या अहवालासह केंद्र सरकारला मागणी करणारे पत्र देण्यात आले आहे. या कार्यात शहरातील नागरिकांनीही सहभागी होऊन निंबाचे लागवड व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.