Published On : Fri, Apr 26th, 2019

‘जुळूनी येती रेशीमगाठी’

वैवाहिक जीवनाच्या गुपितांचे संगीतातून सादरीकरण
रिध्दी-सिध्दी व ऋतुराजचे अनोखे आयोजन

नागपूर: विवाह हा तारुण्यात असताना मधुर वाटणारा पण तेवढाच अवघड वाटत असतो. विवाह हा प्रेमविवाह असो की पारंपरिक पध्दतीचा. दोन जीव आणि दोन कुटुंबांना आयुष्यभर एकत्र आणणारा हा सोहळा असतो. एकप्रकारे नात्यांतून रेशमासारख्या नाजुक धाग्याने जोडला जाणारा हा संस्कार असतो. या निमित्ताने जोडली जाणारी ही नाती चिऱ:काल टिकून राहावी यासाठ़ी विश्वास, त्याग, समजुतदारपणा आवश्यक असतो. रिध्दी-सिध्दी व ऋतुराज या संस्थांनी नुकताच जुळूनी येतील रेशीमगाठी हा अनोखा कार्यक्रम संगीत आणि मार्गदर्शन या माध्यमातून सादर केला.


लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी प्रचंड गर्दी करून हा कार्यक्रम अक्षरश: डोक्यावर घेतला. या कार्यक्रमातून तज्ञांनी केलेले मार्गदर्शन अनेकांच्या वैवाहिक समस्या सोडविणारे ठरले. या कार्यक्रमाची संकल्पना ऋतुराज संस्थेच्या संचालिका मुग्धा तापस यांची होती. प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. शैलेश पानगावकर आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

विवाहानंतर जुळलेले नाते स्वीकारताना आणि ते आयुष्यभर निभावताना सहकार्य, सामंजस्य आवश्यक असते. पूर्वी बालविवाह होत असत त्यानंतर वधू वर ठरविण्याची पध्दत-परंपरा आली. आणि त्यानंतर प्रेमविवाह आणि आता तर लग्नाशिवाय एकमेकांसोबत राहण्याचे लिव्ह इन रिलेशन हे परिवर्तन आले. डॉ. पानगावकर व डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी विवाहानंतरच्या जबाबदार्‍या, जाणीव, परस्परांची अपेक्षापूर्ती, जीवनशैलीत करावा लागणारा बदल, वैवाहिक जीवनाबद्दलच्या गोष्टी त्यांनी याप्रसंगी सांगितल्या. लैंगिक संबंधाचे ज्ञान, तसेच शारीरिक व मानसिक व शारीरिक सुखापर्यंतचे मार्गदर्शन या दोन्ही वक्त्यांनी प्रभावीपणे केले.

वैद्य अय्यर, श्रुती चौधरी या गायकांनी विवाह अनुबंधातील मनाशी संबंधित अनेक श्रवणीय गाणी सादर केली.गोविंद गढीकर, परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्र, विशाल दहासहस्र, मुग्धा तापस या वाद्यवृंदांची साथसंगत कार्यक्रमात होती. निवेदन किशोर गलांडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन आणि संचालन रिध्दी सिध्दी संस्थेचे डॉ. संजय धोटे यांनी केले. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, प्रा. राजीव हडप, भय्याजी रोकडे, शरयू तायवाडे, डॉ. विजय धोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.