Published On : Thu, Jun 24th, 2021

मसोनिक लॉज तर्फे पाचपावली सुतिकागृहाला कोलपोस्कोपी मशीन

महापौरांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर महानगरपालिका संचालित पाचपावली सुतिकागृह येथे मसोनिक लॉज विदर्भ नं.४७० या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कोलपोस्कोपी मशीन प्रदान करण्यात आली. मनपाच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही मशीन स्वीकारली.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दीप प्रज्वलन करुन मशीनची पूजा केली. महिलांचे ग्रीवा कँसर, जतनांगमध्ये मस्सा, गर्भाशय ग्रीवाशोथ, सरवाईकलचे दुखणे, योनीमधून असामान्य पाणी जाणे, वुल्वर कँसरसारख्या आजाराचे लक्षण आढळल्यास कोलपोस्कोपी करण्याचा सल्ला दिल्या जातो, अशी माहिती डॉ. संगीता खंडाईत यांनी दिली. ही मशीन प्राप्त झाल्यामुळे आता दर महिन्याला येथे शिबिर आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महिलांमध्ये संबंधित आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पाचपावली सुतिकागृहात उपलब्ध करून देण्यात आलेल्या कोलपोस्कोपी मशीन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून म.न.पा.व्दारे ‘वंदे मातरम’ हेल्थ सेंटर सुरू करण्यात येत आहे. यासाठी विविध सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. लॉज विदर्भ संस्थेने यामध्येही सहकार्य करावे, अशी विनंती महापौरांनी यावेळी केली.

यावेळी आरोग्य समिती सभापती संजय महाजन, आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, पाचपावली सुतिकागृह प्रमुख डॉ. संगीता खंडाईत, आशीनगरचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, लॉज विदर्भ नं. ४७० स्वयंसेवी संस्थेचे ग्रॅण्ड मास्टर ऑफ इंडिया राजीव खंडेलवाल, रिजनल ग्रॅण्ड मास्टर डॉ. यग्नेश ठाकर, एआरजीएँ आसिफ चिमथानवाला, अध्यक्ष मयुरेश कत्यानन, प्रकल्प समन्वयक प्रथमेश देशपांडे आदी उपस्थित होते. आभार डॉ. दिपंकर भिवगडे यांनी मानले.