नागपूर : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी थेट पांढूरणा गावात भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी स्वतः मैदानात उतरून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.
डॉ. इटनकर यांनी गावातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत प्रशासनाच्या यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पुरामुळे बाधित झालेल्या ठिकाणी मदत व बचावकार्य वेगात सुरू आहे. प्रशासनाकडून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर लक्षात घेता संपूर्ण प्रशासन अलर्टवर ठेवण्यात आले असून, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागाच्या यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.