नागपूर : विदर्भात हिवाळ्याने आता खऱ्या अर्थाने प्रवेश केला आहे. रविवारी सकाळी अनेक जिल्यांत दवबिंदू, धुकं आणि गार वाऱ्यांचा अनुभव आला. गोंदिया 11.5 अंश सेल्सिअसवर थंडीत गारठला असून तो विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. तर भंडारा, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि नागपूरमध्येही तापमान घसरल्याने थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे.
मौसम खात्याच्या माहितीनुसार, भंडाऱ्याचे तापमान 12 अंश, अमरावती 12.5, वाशीम 12.6 आणि यवतमाळ 13 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. नागपूरचा नीचांक 14.4 अंश सेल्सिअस असून तो सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी आहे. अकोला 14.3, बुलढाणा 13.8, चंद्रपूर 16.8 आणि ब्रह्मपुरी 15.4 अंशांवर नोंदवले गेले आहेत.
उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गोंदिया, भंडारा आणि अमरावतीत पारा 10 अंशांच्या आसपास येऊ शकतो.
थंडीचा असर दिवसातही-
आता फक्त सकाळ-संध्याकाळच नव्हे तर दिवसाही गारवा जाणवू लागला आहे. नागरिक जॅकेट, स्वेटर आणि गरम कपडे घालून बाहेर पडताना दिसत आहेत. रस्त्यावर आणि बाजारात चहाच्या टपऱ्यांवर गर्दी वाढली असून, विदर्भात हिवाळ्याचा माहोल चांगलाच रंगू लागला आहे.










