
नागपूर – महाराष्ट्रात डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार ३ डिसेंबरपासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढू शकते. काही भागांत कोल्ड वेव्ह (थंडीची लाट) जाणवण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण : कोरड्या वातावरणाची शक्यता-
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी वाऱ्यांची तीव्रता कमी असून, दिवसाचे तापमान सामान्य पातळीवर राहण्याची शक्यता IMD ने व्यक्त केली आहे.
मध्य महाराष्ट्र : थंडीचा येलो अलर्ट-
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि घाटमाथ्यावरील भागात हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तापमानात अचानक घसरण होणार असल्याने सकाळी आणि रात्री गारवा अधिक जाणवेल. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतही थंडी वाढणार असून संबंधित विभागांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
मराठवाडा : तापमानात घट, गारठा वाढणार-
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वातावरण कोरडे राहणार असून तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक वाढेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.
विदर्भ : नागपूरसह काही जिल्ह्यांत थंडीची लाट?
विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता असून तापमानात मोठी घट अपेक्षित आहे. नागपूरमध्ये विशेषतः रात्री आणि सकाळच्या सुमारास कडाक्याची थंडी जाणवू शकते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात थंडीची चालू लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करण्यासह आवश्यक ती काळजी घेण्याची सूचना तज्ज्ञांनी केली आहे.









