Published On : Wed, Jan 24th, 2018

सीमेंट रस्त्यांचे समतलीकरण १५ दिवसांत करण्यात यावे : संजय बंगाले

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी सीमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. बांधकाम पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीस मोकळे करण्यात यावे, तसेच सीमेंट रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, चौकातील जंक्शनचे समतलीकरण १५ दिवसात करण्यात यावे, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.

मंगळवार (ता.२३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्त्याच्या तीनही टप्प्याच्या बांधकामाचा आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासमवेत समिती उपसभापती अभय गोटेकर, सदस्या विद्या कन्हेरे, रश्मी धुर्वे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, डी.डी.जांभूळकर, मोती कुकरेजा, शकील नियाजी, उपअभियंता श्री. माटे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी समितीने शहरात सुरू असलेल्या सीमेंटच्या रस्त्यांचा टप्प्यानुसार आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात ३० कामांपैकी १४ रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. कंत्राटदारांचे देयके नियमित नसल्याने त्यांनी कामे थांबविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सभापतींना दिली. पहिल्या टप्प्यातील बांधकाम समाधानकारक आहे की नाही याची सुद्धा माहिती बंगाले यांनी घेतली. घाट रोड मार्गावरील रस्त्याला भेगा पडल्याने त्या कामात चौकशी करण्याचे आदेश सभापती संजय बंगाले यांनी दिले. चौकशीअंती जो दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशसुद्धा त्यांनी दिले. हे प्रकरण शहरातील अग्रकमांकावरील संस्थेला सर्वेक्षणासाठी पाठविण्यात आलेले आहे. त्यांचा अहवाल समोर आल्यानंतरच निर्णय घेण्यात यईल, अशी माहिती मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील रस्ते बांधकामाची मुदत संपत आहे. तरीही ५० टक्के काम अपूर्ण का आहे, असा सवाल सभापती संजय बंगाले यांनी केला असता निर्माणाधीन असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण असल्याने बांधकामास अडथळा होत आहे. ज्या रस्त्यांचा बांधकामास अडथळा होत आहे, अशा रस्त्यांबाबत पुनर्विचार करा, असे निर्देश बंगाले यांनी दिले.

दुसऱ्या टप्प्यातील रस्ते बांधकामाची माहिती शहर अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात ५९ रस्त्यापैकी ४८ रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यापैकी १९ रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एका रस्त्याच्या बांधकामास अडथळा येत असल्याने तो रस्ता रद्द करण्यात आला, त्याऐवजी स्थायी समिती द्वारे प्रस्तावित करून दुसरा रस्ता निवडण्यात येणार असल्याची माहिती तालेवार यांनी दिली. दोन रस्त्यांमधील भाग समतल करणे अत्यावश्यक आहे, गाडी त्यावरून गेली असता उसळते, त्यामुळे तो भाग समतल करण्यात यावा, असे आदेश संजय बंगाले यांनी दिले. १० रस्त्यांचे बांधकाम अद्याप सुरूच झाले नसल्याने त्याचे कारण सभापतींनी विचारले असता, पोलिस परवानगी मिळत नसल्याने बांधकाम थांबविले असल्याची माहिती तालेवार यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यातील सीमेंट रस्त्याच्या कामाची माहिती कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा यांनी दिली. तिसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये ४१ किमी रस्ते अंतर्भूत आहेत. यासंबंधीच्या निविदा दोनदा काढण्यात आलेल्या आहेत. काही रस्त्यांसाठी शासनाने व नासुप्रने निधी मंजूर केलेला आहे. योग्य तो निर्णय घेऊन त्यासंबंधीच्या कामाचे कार्यादेश वितरीत करावे, असे आदेश संजय बंगाले यांनी दिले.

वरील रस्त्यांच्या कामांमध्ये सुरक्षा रक्षक नसल्यांने अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. उपरोक्त कंपनीनी नियमानुसार त्या ठिकाणी सुरक्षा गार्ड ठेवणे बंधनकाराक आहे. वरील सुरक्षा रक्षक तातडीने प्रत्यक्षकामाच्या ठिकाणी नेमावे व त्याठिकाणी कार्यकारी अभियंत्यांनी तपासावे असे निर्देश, श्री. बंगाले यांनी दिले.

यानंतर जियोटेक या यंत्रणेमार्फत सीमेंट रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा आढावा सभापतींनी घेतला. बैठकीला उपअभियंता, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.