Published On : Mon, Jan 6th, 2020

धावत्या रेल्वेत कोळसा चोरी

Advertisement

– गुमगाव आणि डी कॅबिन परिसर टारगेट, चंद्रपुरातही रॅकेट

नागपूर: मध्य रेल्वे नागपूर विभागात कोळसा चोरीचे प्रमाण वाढले आहे. थंडी वाढताच भुरटे चोर धावत्या रेल्वेतून मोठ्या प्रमाणात कोळसा पाळत असल्याची धक्कादायक बाब सूत्राकडून मिळाली आहे. याप्रकारामुळे रेल्वेचा महसूल बुडत असून हा प्रकार रेल्वे संपत्तीचे संरक्षण करणाèयांच्या लक्षात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागात आरपीएफ आणि आरपीएफची गुप्त सुरक्षा व्यवस्था आहे. मोठ्या प्रमाणावर जवान असल्यानंतरही नागपूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात कोळसा पाडल्या जातो. अर्थात डी कॅबिन पुढे कोळशाची चोरी होत आहे. याशिवाय मानकापुरच्या पुढील भागात म्हणजे गुमगाव जवळही कोळसा चोरीचे प्रमाण आहे. मात्र, या चोरट्यांना पकडून कारवाई करण्यात आल्याचे सध्यातरी ऐकण्यात नाही.

वीज निर्मीतीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर होतो. मालगाडीने वीज निर्मीती केंद्रात कोळसा पुरवठा केला जाते. मालगाडीची गती तशीही फार नसतेच याच संधीचा फायदा घेता परिसरातील लोक आणि काही विशिष्ट टोळके धावत्या मालगाडीतून कोळसा चोरतात. चोरी केलेला कोळसा घराघरा पुरविला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याशिवाय चंद्रपुरात तर कोळसा चोरांची टोळीच आहे.

मोठे रॅकेट असल्यानंतरही कोळसा माफिया विरुध्द पाहिजे तशी मोहीम राबविली जाताना दिसून येत नाही. सततच्या कोळसा चोरीमुळे रेल्वेचे महसूल बुडत आहे. त्यामुळे कोळसा चोरांच्या मुसक्या आवळून या टोळीचा पर्दाफाश करने गरजेचे आहे.

… तर कारवाई करू
कोळसा चोरी होत असल्यासंदर्भात माझ्याकडे कुठलीच माहिती नाही. असा प्रकार होत असल्यास कारवाई करू असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी सांगितले.