Published On : Mon, Jan 6th, 2020

खासगी ट्रॅव्हल्स संदर्भात सर्वकष धोरणासाठी शहरातील नागरिकांकडून सूचना आमंत्रित

समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांचा निर्णय : सर्व दृष्टीने सोयीचा अहवाल महापौरांना करणार सादर

नागपूर : शहरातील खासगी ट्रॅव्हल्समुळे निर्माण होणा-या समस्येबाबत संबंधित सर्व विभागांशी चर्चा सुरू आहे. मात्र यासाठी शहरातील नागरिकांना आणि ट्रॅव्हल्सधारकांनाही फटका बसणार नाही, अशा धोरणाची गरज आहे. हे धोरण तयार करण्यासाठी याबाबत शहरातील नागरिक तसेच ट्रॅव्हल्स क्षेत्रातील लोकांकडून सूचना आमंत्रित करण्यात येणार आहे. या सूचना आमंत्रित करण्याबाबत येत्या ६ जानेवारी २०२०ला आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खासगी ट्रॅव्हल्ससंदर्भात महापौरांद्वारे गठीत समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली.

खासगी ट्रॅव्हल्सला शहराबाहेर थांबवायचे काय? कुठल्या कायद्यांतर्गत थांबवायचे? व पोलिसांची कशी मदत असावी या संदर्भातील संपूर्ण धोरण निश्चीत करण्याकरीता महापौरांच्या निर्देशान्वये माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्यात आली आहे.

शनिवारी (ता.४) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, समितीचे सदस्य सर्वश्री सुनील अग्रवाल, संजय महाकाळकर, संजय बुर्रेवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नासुप्रचे अधीक्षक अभियंता पी.पी. धनकर, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, सहायक आयुक्त राजू भिवगडे, स्नेहा करपे, किरण बगडे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, मनपा वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता शकील नियाजी, पी.जे. आसलकर, परिवहन विभागाचे प्रशासन अधिकारी रवींद्र पागे, केदार मिश्रा, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) दिनकर मनवार, मनपा जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, महामेट्रोचे महेश गुप्ता, वाहतूक पोलिस विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक संजय जाधव, बर्डी वाहतूक पोलिस विभागाचे एएसआय सिंग, कॉटन मार्केट वाहतूक विभागाचे आर.एम.चहांदे आदी उपस्थित होते.

यावेळी खासगी बस खासगी ट्रॅव्हल्सला शहराबाहेर थांबवायचे काय? कुठल्या कायद्यांतर्गत थांबवायचे? व पोलिसांची कशी मदत असावी? या विषयावर संबंधित विभागांच्या प्रतिनिधींकडून चर्चा करण्यात आली. शहरातील खासगी ट्रॅव्हल्सच्या समस्येबाबत ट्रॅव्हल्स संचालकही अवगत आहेत. शहराबाहेर खासगी ट्रॅव्हल्स संचालकांचाही याबाबत सकारात्मक प्रतिसाद आहे. यासर्वांसह शहरातील नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे यासंदर्भात शहरातील नागरिकांसह खासगी ट्रॅव्हल्सशी संबंधितांकडून सूचना मागविण्यात येतील. या सूचनांच्या आधाराने सर्वकंष व सर्वांना दिलासादायक ठरेल असे धोरण निश्चीत करण्यात येणार आहे. नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा यांना प्राधान्य देउनच हे धोरण निर्धारित करण्यात येईल, असेही समिती अध्यक्ष प्रवीण दटके यांनी यावेळी स्पष्ट केले.