Published On : Sat, Apr 4th, 2020

लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून तातडीने निर्जंतुकीकरण फवारणी पूर्ण करा!

महापौर संदीप जोशी यांचे प्रशासनाला निर्देश : सॅनिटायझेशन व फवारणी संदर्भात आढावा

नागपूर : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी मनपातील अधिकारी, कर्मचारी सर्वच मेहनत करीत आहेत. याशिवाय लोकप्रतिनिधीही त्यांच्याकडे येणा-या तक्रारी आपल्या स्तरावर सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य करीत आहेत. परिस्थितीशी दोन हात करताना सर्वच लढा देत आहेत. मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण आणि फवारणीचे कार्य हाती घेण्यात आले आहेत. मात्र या कार्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. याच समन्वयातून तातडीने उर्वरित निर्जंतुकीकरण फवारणी पूर्ण करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

नागपूर शहरात सद्यस्थितीत सॅनिटायझेशन व फवारणी बाबत नागरिक व लोकप्रतिनिधींमधील प्रचंड असंतोषासंदर्भात शनिवारी (ता.४) महापौरांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षापुढील आवारात झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, तथा सर्व झोनचे झोनल अधिकारी (स्वच्छता) उपस्थित होते.

प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी सॅनिटायझेशन आणि फवारणीचा झोननिहाय आढावा घेतला. शहरात दररोज निर्जंतुकीकरण केले जाते. गर्दीच्या ठिकाणी तसेच ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले त्या भागात प्राधान्याने फवारणी केली जात आहे. शहरातील ब-याचशा भागांमध्ये बहुतांशी निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याची माहिती यावेळी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली.

नेहरूनगर झोनमधील अनेक भागामध्ये फवारणी झाली नसल्याच्या अनेक तक्रारी दररोजच नागरिकांकडून येत आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात बहुतांशी काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात दैनंदिन आढावा घेणारी यादी सर्व नगरसेवकांना देण्यात यावी, असे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.

मनपाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण शहरात कार्य सुरू आहे. मात्र प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी समन्वयातून कार्य केल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतील, असे मत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी मांडले.

मोठ्या वस्त्यांमध्ये वाहनावरील मोठ्या मशीनद्वारे फवारणी करण्यात येते. मात्र अरुंद रस्ते असणा-या ठिकाणी हे वाहन जाउ शकत नाही. ‘हँड फॉगींग’ मशीनचीही मनपाकडे कमी आहे. त्यामुळे अरुंद रस्ते आणि वस्त्यांकरीता छोट्या वाहनांची व्यवस्था करण्याची सूचना सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मांडली.

कोरोनाशी लढा देण्यासाठी मनपाचा आरोग्य आणि स्वच्छता विभाग उत्तम कार्य करीत आहे. त्यांनी आपल्या कार्याची गती पुढेही अशीच कायम ठेवावी, अशी अपेक्षा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केली.

संबंधित भागातील निर्जंतुकीकरणासंदर्भात लोकांना काही माहिती दिली जात नसल्याने नागरिक नगरसेवकांवर असंतोष व्यक्त करतात. प्रशासनाद्वारे फवारणी संदर्भात माहिती देण्यासाठी निर्जंतुकीकरण गाडीवर कोरोना जनजागृतीसह निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणा-या औषधाची माहिती देणारी ऑडिओ क्लिप वाजण्यात यावी, अशी सूचना यावेळी ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर प्रवीण दटके यांनी मांडली.

नागरिकांच्या मनात असलेल्या कोरोनाच्या भितीमुळे सर्वच भागातून निर्जंतुकीकरणाची मागणी केली जात आहे. नागरिकांच्या या असंतोषाचा सामना स्थानिक नगरसेवकांना करावा लागतो. निर्जंतुकीकरण अथवा फवारणीसाठी स्थानिक नगरसेवक आवश्यक ती मदत करण्यास तयार आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्याशी योग्य समन्वय साधणे गरजेचे आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात संबंधित झोनल अधिका-यांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे तसेच त्यांच्याशी योग्य समन्वय साधून उर्वरित भागातील निर्जंतुकीकरणाचे कार्य तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.


निर्जंतुकीकरण कार्य १० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार : आयुक्त तुकाराम मुंढे
शहरातील बहुतांशी भागातील निर्जंतुकीकरण कार्य लवकरच पूर्ण होण्याची स्थिती आहे. मनपाद्वारे मोठ्या वस्त्यांवर वाहन आणि लहान वस्त्यांमध्ये छोट्या मशीनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड मिश्रणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात १०० टक्के निर्जंतुकीकरण कार्य होईल, असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनापासून बचावासाठी घरात राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आणखी पुढे काही दिवस कॉटन मार्केट सुरू करता येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधींकडून येणा-या सूचनांचा विचार करून त्यावरही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भातील दैनंदिन माहितीचा अहवालही सर्व नगरसेवकांना देण्यात येईल. फायलेरिया विभागामार्फत होणा-या फवारणीचेही कार्य प्रगतीपथावर आहे. या फवारणीसाठी प्रत्येक झोनमधील तिव्र संवेदनशील, मध्यम संवेदनशील आणि कमी संवेदनशील अशा भागांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे तिव्र संवेदनशील भागांमध्ये फवारणीला प्राधान्य दिले जात आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच भागात वैज्ञानिक पद्धतीने फवारणी केली जात आहे. याशिवाय डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणीही फवारणी केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी ‘पॅनिक’ न होता घरीच बसून राहावे, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी केले.

बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र गर्दी टाळण्याचे निर्देश दिले जात आहेत. त्यानुसार शनिवारी (ता.४) झालेल्या बैठकीमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.

महापौर कक्षामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बैठकीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता महापौर संदीप जोशी यांनी महापौर कक्ष व उपमहापौर कक्ष यांच्यामधील आवारामध्ये बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आवारामध्ये तीन फुटाचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.