Published On : Sat, Aug 3rd, 2019

मुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भातील कामांचा लेखाजोखा

नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकसंवादाची यात्रा म्हणजेच महाजनादेश यात्रा सुरू आहे. शनिवारी त्यांची यात्रा नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात आहे. २०१४ पासून आपल्या सरकारने विदर्भासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडला. तसेच विरोधकांची कानटोचणीही केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री थोडक्यात :

– २०१४ ला आम्ही सत्तेवर आलो तेव्हा २००९ च्या लोकांना देखील वीज कनेक्शन मिळाले नव्हते. तो बॅकलॉग आम्ही भरून काढला आहे.

– जे प्रकल्प २० वर्षे पूर्ण झाले नव्हते ते सर्व प्रकल्प आमच्या काळात आता पूर्ण होतील.

– मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाचे मोठे जाळे आम्ही विदर्भात तयार करण्याचे काम केले आहे.

– नागरविकासाच्या माध्यमातून अभूतपूर्व योजनांसाठी आपण निधी उपलब्ध करून दिला

– विदर्भातील मागासभागाचा देखील आम्ही विकास केला आहे

ओबीसी समाजाबाबत भाष्य करताना मुख्यमंत्री

– आम्ही काय अध्यादेश काढला हे समजून न घेता काही लोक भाष्य करत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये अनेक वर्षे आरक्षण आहे.

– ज्या २० जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांच्यावर आरक्षण आहे त्याठिकाणी कायद्यात बदल करून, तिथल्या लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, हा निर्णय आम्ही घेतला.

– आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय समजून घेऊन आदेश दिला. त्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला.

– हे राज्य सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ.

ईव्हीएमवरून विरोधकांना टोला

विरोधी पक्षांनी ‘ईव्हीएम’विरोधात एकत्र येत एल्गार पुकारला आहे. यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. “विरोधी पक्षाच्या लक्षांत आले नाही ईव्हीएम ही मशीन आहे. जर मतदारांशी संवाद केले तर मतं मिळू शकतात. हताश आणि निराश तसेच मुद्द्यापासून भरकटलेला विरोधी पक्ष इतिहासात पाहिला नाही. भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास वाढला पाहिजे, असे काम विरोधीपक्षाने केले पाहिजे”, अशी कानटोचणी त्यांनी यावेळी केली.