Published On : Mon, Jul 2nd, 2018

सिडकोमधील १६०० कोटींच्या जमीन घोटाळ्याला मुख्यमंत्री जबाबदार : संजय निरुपम

नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडको भागातली जमिनीवरून काँग्रेसने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसकडून आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. यावेळी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपण यांनी राज्य सरकारवर सनसनाटी आरोप केले.

सिडकोमध्ये २४ एकर जमीन सोळाशे कोटी रुपये किंमत असून, ही जमीन बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना अवघ्या ३ कोटी रुपयात हस्तांतरित करण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यामध्ये मंत्रालयातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.यातील बिल्डर भालेराव हे प्रसाद लाड यांचे खास दोस्त आहेत. तर प्रसाद लाड यांच्या मुख्यमंत्र्यांचे व्यवसायिक सहकारी आहेत.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संबंधीत आठ शेतकऱ्यांच्या नावे ही जागा आहे. ही जागा सिडकोच्या ताब्यातील असून, या जागेचा पूर्ण व्यवहार पनवेल तहसिल कार्यालयाने केला आहे. सिडको अथवा कुठल्याही सरकारी यंत्रणेने विरोध तर केलाच नाही उलट बेकायदेशीर कृत्य करण्यात सहाय्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

हा व्यवहार ३७१ रुपये प्रति चौरस मीटर दराने झाला आणि सध्या या भागातला दर प्रति चौरस मीटर १.८४ लाख रुपये इतका आहे. या व्यवहारामुळे जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. या व्यवहरातील उर्वरीत रक्कम भाजपाला निधी म्हणून देण्यासाठीच केल्याचा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, रणजीत सुरजेवाला व संजय निरुपम यांनी केला आहे.