Published On : Thu, May 2nd, 2019

मुख्यमंत्र्यांनी घेतली शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट

गडचिरोली – गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात 15 पोलीस जवान शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत जाऊन शहिदांना मानवंदना दिली. तसेच, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शहिदांच्या कुटुंबीयांचा आक्रोश व्यर्थ जाऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीसांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

गडचिरोली येथील पोलीस मैदानावर शहीद जवानांना राज्य पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शहिदांना अभिवादन केले. नक्षलींच्या भ्याड हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आहेत. यासदर्भात स्वत: डीजी अंतर्गत चौकशी करत आहेत. आपल्या पोलीस दलाने गेल्या 2-3 वर्षात नक्षलवाद्यांवर कारवाई केली. त्यामुळे नक्षलवाद्यांनी बदला घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आम्ही जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार, परिवाराचा आक्रोश वाया जाऊ देणार नाही. आज, आम्ही प्रचंड दुखी आहोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नक्षली कारवायांविरुद्ध सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच नक्षल समस्येचा आम्ही आणखी ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने मुकाबला करू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाले. त्यानंतर, माजी संरक्षणमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना जबाबदारीची आठवण करुन दिली आहे.