Published On : Thu, Mar 7th, 2019

पहा विडिओ: मुख्यमंत्री, गडकरी आणि ‘दही-समोसा’ @ नागपुरातील फुटाळा परिसर

नागपूर : नेता कितीही मोठा झाला तरी तो आपल्या कार्यकर्ता जीवनातील प्रसंग व आठवणी कधीच विसरत नाही. वेळ व संधी मिळाली की आठवणींशी जुळलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी ते तत्परता दाखवितातच. नागपुरातील फुटाळा परिसर तलावासोबतच जवळच हनुमान मंदिराजवळील समोशांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. तेथील चव भल्याभल्यांना खेचून नेते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील याला अपवाद ठरले नाहीत. फुटाळा परिसरातील कार्यक्रमाअगोदर दोघेही तेथील एका प्रख्यात दुकानात पोहोचले.

यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अनिल सोले, आ.सुधाकर देशमुख, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी हेदेखील होते. गडकरी यांचे समोसे प्रेम सर्वश्रुत आहेच.

मागील काही काळापासून ‘डाएट’वर लक्ष देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीदेखील काही काळासाठी ‘डाएटिंग’ बाजूला सारले व दोघांनीही आवडत्या दही समोसा व पकोडे यांचा आस्वाद घेतलाच. यावेळी जुन्या आठवणी व प्रसंगांवर चर्चा झाली आणि उपस्थित लोकांना दोन्ही नेत्यांमधील एका सर्वसाधारण नागरिकाचे दर्शन झाले.