नागपूर: नागपूर महानरपालिका परिवहन विभाग व बस ऑपरेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील बसेस स्थानकांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार व परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी परिवहन समिती सदस्या अर्चना पाठक, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, सभापती यांचे स्वीय सहायक योगेश लुंगे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पागे, अरुण पिपुरडे, प्रभो बोखारे, गिरीश महाजन प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ हे अभियान देशभरात सुरू केले. याच अभियानाअंतर्गत परिवहन विभाग व ऑपरेटर्सच्या वतीने चालक, वाहक, संचालक यांनी श्रमदान केले.
या अभियानाचा शुभारंभ महाराजबाग चौकातील बस स्थानकापासून महापौरांच्या हस्ते झाला. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी हातात झाडू घेऊन बस स्थानक स्वच्छ करून मोहिमेचा शुभारंभ केला. परिवहन विभागाद्वारे शहरातील १५८ बस स्थानके स्वच्छ करण्यासाठी विभागाच्या पाच चमूची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.
परिवहन विभागाच्या ‘ अटल बिहारी ज्येष्ठ नागरिक सवलत योजने’चा शुभारंभ यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. कृष्णराव खंडाळे, प्रमोदराव अंजनकर या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे अर्धे तिकीट देण्यात आले. परिवहन विभागाच्या ‘आपली बस’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलतीचे दर उपलब्ध करण्यात आले असून याचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना शासनमान्य ओळखपत्र सादर करावे लागणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती बंटी (जितेंद्र) कुकडे यांनी दिली. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बस ऑपरेटर्स, संचालक, वाहक, चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.