Published On : Fri, Jul 14th, 2017

उद्यानातील स्वच्छतागृहांची दिवसातून दोन वेळा सफाई करा

Advertisement

नागपुर: नागपूर शहरातील उद्यानांमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळी हजारो नागरिक येतात. मात्र, तेथे असणाऱ्या स्वच्छतागृहासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आहेत. आरोग्य विभागाकडे त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी असली तरी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून दररोज स्वच्छतागृहांची स्वच्छता करायलाच हवी. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या झोनल अधिकाऱ्यांना तातडीने पत्र देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर शहरातील उद्यानांमध्ये होत असलेल्या स्थापत्यविषयक कामांचा आणि उद्यान देखभालीचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सभापती संजय बंगाले यांच्यासह सदस्य पल्लवी श्यामकुळे, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमला मो. इब्राहीम, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, कनिष्ठ अभियनता पी.आर. बांते, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार, अनंता नागमोते आणि श्री. शेंडे उपस्थित होते.

सभापती संजय बंगाले यांनी उद्यानातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसंदर्भात नाराजी व्यक्त करीत नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या तक्रारींचा हवाला दिला. उद्यानांमध्ये फिरायला येणाऱ्यांमध्ये सुमारे ७५ टक्के संख्या ज्येष्ठ नागरिकांची असते. त्यातील बहुतांश व्यक्ती स्वच्छतागृहांचा वापर करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे आपले कर्तव्य आहे. सकाळी आणि संध्याकाळी नागरिक उद्यानात येत असेल तर दुपारी आणि सकाळी ६ वाजता स्वच्छतागृहांची स्वच्छता व्हायलाच हवी. उद्यान विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावर स्वत: लक्ष केंद्रीत करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता स्वच्छ उद्यान ही संकल्पना राबवायला हवी. मोठ्या उद्यानांमध्ये कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प सुरू केल्यास उद्यानातील झाडांना त्याचा उपयोग होईल, असेही श्री. बंगाले यांनी सुचविले. उद्यानातील नादुरुस्त खेळण्यांकडेही उद्यान विभाग कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

उद्यान अधीक्षक सुधीर माटे यांनी उद्यान विभागाची संपूर्ण माहिती सभापती व सदस्यांना दिली. उद्यान विभागातील कर्मचारी कमी झाले असून सुमारे ७७ कर्मचारी इतरत्र हलविण्यात आले आहेत. उद्यान निरिक्षकाच्याही पाच पैकी तीन जागा रिक्त आहेत. यासंदर्भात आयुक्तांच्या परवानगीने प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. अनुकंपामध्ये भरती करण्यात आलेल्या १० कर्मचाऱ्यांना झोननिहाय निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते वेळोवेळी उद्यानाचे निरीक्षण करतात. उद्यान देखरेखीचा कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आला असून त्यांचे काम असमाधानकारक असल्याची माहितीही श्री. माटे यांनी दिली. ज्या उद्यानांत स्वच्छतागृहे नाहीत तेथे बायोडायजेस्टर टॉयलेट देण्यासंदभारतील प्रस्ताव असून लवकरच ती व्यवस्था होईल. कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पासंदर्भात महिला व बालकल्याण समितीची मदत घेण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महिला बचत गटांना हा कंत्राट देण्यात येणार आहे. त्यांनी तयार केलेले कंपोस्ट खत संबंधित कंत्राटदाराला विक्री करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी समितीच्या अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले.