नागपूर – आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने शहरातील तीनही नद्या – नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी यांची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत एकूण 39.04 किलोमीटर नदीपात्राची सफाई पूर्ण झाली असून 30,065 घन मीटर गाळ हटवण्यात यश आले आहे.
महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नद्यांचे आणि नाल्यांचे स्वच्छीकरण करते, जेणेकरून पावसात पाणी साचण्याचा आणि पुराचा धोका टाळता येईल. यंदा ही मोहीम महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या सूचनेनुसार व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीची एकूण लांबी 49.17 किलोमीटर आहे. यामध्ये नाग नदी 16.58 किमी, पिवळी नदी 17.42 किमी आणि पोहरा नदी 15.17 किमी लांब आहे.
नद्यांमधून गाळ काढून पावसाचे पाणी मोकळ्या प्रवाहात वाहू देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता वाढते आणि अडथळे दूर होतात. यासाठी पोकलेन, जेसीबी आणि टिपर यंत्रांचा वापर केला जात आहे.
नाग नदीच्या पाच टप्प्यांत 11.84 किमी स्वच्छता पूर्ण झाली असून, अंबाझरी तलावापासून पंचशील चौक, अशोक चौक, सेंट जेवियर स्कूल ते पारडी उड्डाणपूल आणि पुढे संगमापर्यंतचा भाग समाविष्ट आहे. या टप्प्यात 20,254 घन मीटर गाळ हटवण्यात आला.
पिवळी नदीच्या तिन्ही टप्प्यांमध्ये – गोरेवाडा तलाव ते नारा दहन घाट, नंतर एसटीपी वंजरा आणि अखेर संगमापर्यंत – 14.45 किमी परिसर स्वच्छ करण्यात आला असून 4,610 घन मीटर गाळ काढण्यात आला आहे.
पोहरा नदीच्या स्वच्छतेसाठी सहकार नगर घाट ते बेलतरोडी पूल, तेथून पिपळा फाटा आणि पुढे नरसाळा-विहीरगाव दरम्यानचा 12.76 किमी भाग साफ करण्यात आला आहे. येथे एकूण 5,201 घन मीटर गाळ हटवण्यात आला.
ही मोहीम 9 पोकलेन, 1 जेसीबी व 1 टिपरच्या सहाय्याने राबवली जात असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी सांगितले की, संपूर्ण स्वच्छता मोहीम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल.