Published On : Sun, Mar 29th, 2020

‘लॉकडाऊन’ काळात शहर स्वच्छ करा!

महापौर आणि आरोग्य सभापतींचे निर्देश

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सध्या लॉकडाऊन असून शहर स्वच्छतेसाठी त्याचा फायदा घेता येईल. प्रशासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण शहर स्वच्छ करून घ्यावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी आणि आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले आहे.

‘लॉकडाऊन’मुळे नागरिक घरात आहेत. रस्त्यावर केवळ आवश्यक कामासाठी बाहेर निघणारे व्यक्ती आहे. शहरातील रस्ते पूर्णत: निर्जन झाले आहेत. याचा फायदा घेत आरोग्य विभागाच्या (स्वच्छता) कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा, बांधकाम साहित्य, फुटपाथवरील कचरा, साहित्य व अन्य साहित्य ज्यामुळे शहर विद्रुप दिसते, ते सर्व उचलण्याचे आणि स्वच्छ करावे, असे निर्देश त्यांनी दिले आहे.

अस्वच्छतेमुळे आरोग्यावर परिणाम होतो. इतर वेळी व्यक्ती रस्त्यांवर असतानाही स्वच्छता केली जाते. मात्र आता कुणीही नागरिक, वाहन रस्त्यावर नसल्याने स्वच्छता सहज शक्य आहे. उडणाऱ्या धुलिकणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. संपूर्ण शहर स्वच्छ करण्याची हीच उत्तम वेळ असून सध्या थैमान घातलेल्या रोगाला यामुळे प्रतिबंध घालण्यास मदत होईल. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी आणि आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले आहे.