Published On : Wed, Oct 27th, 2021

जनआंदोलनाच्या माध्यमातून स्वच्छ भारत यशस्वी होईल : गजभे

Advertisement

– ‘स्मार्ट व्हिलेज अवॉर्ड’ ही मानापूरची ओळख : उपमुख्य कार्यकारी अधिकारी

गडचिरोली – आज स्वच्छ भारत अभियानाने जनआंदोलनाचे रूप धारण केले आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी लक्षात घेऊन स्वच्छतेचे पालन करणे देखील आवश्यक आहे असे आमदार कृष्णाजी गजभे यांनी मानापूर येथे आयोजित स्वच्छ भारत कार्यक्रमात संगितले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत विभागीय जनसंपर्क ब्युरो, वर्धा आणि जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या अंतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एकट्या सरकारकडून सर्वच मोहिमा यशस्वी होतील अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे आमदारांनी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. जनतेनेही एक पाऊल पुढे येऊन सरकारला सहकार्य करावे. प्लास्टिकचा वापर न करण्यासोबतच पाण्याची बचत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. गावात राहिलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मानापूर ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक करताना जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिवंज म्हणाले की, गावाने शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जेणेकरून ग्रामस्थांची स्थिती सुधारू शकेल. जिल्हा परिषद सदस्य संपत जी आडे म्हणाले की, लोकसहभाग आणि समाजकारणातूनच सुंदर गाव, सुंदर देशाचे स्वप्न साकार होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या मानापूर येथे आयोजित या कार्यक्रमास सरपंच कुंदा ताई नारनवरे, उपसरपंच वैशाली ताई खुणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी स्वयंसेवेची शपथ घेतली. विवेकानंद हायस्कूलच्या मुलांनी रांगोळी स्पर्धा, प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच रॅली काढली.

यावेळी ग्रामपंचायत मानापूर तर्फे ओला कचरा व सुका कचरा ठेवण्यासाठी डब्बे गावात वाटप करण्यात आले. यासोबतच भंडारा येथील एएसआर फाऊंडेशनच्या कलापथकातर्फे लोकांना मनोरंजन व स्वच्छतेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक प्रचार अधिकारी इंद्रवदन सिंग झाला यांनी केले तर सूत्रसंचालन अमित मानुसमारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि संजय तिवारी, तांत्रिक सहाय्यक, प्रादेशिक जनसंपर्क ब्युरो, नागपूर यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामसेवक कु. वैशाली ढोरे यांनी केले.