Published On : Thu, Sep 14th, 2017

‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा १५ ला शुभारंभ

Advertisement

नागपूर: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात’स्वच्छता हीच सेवा’ मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार (ता.१५) ला मनपा मुख्यालयात महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत ‘स्वच्छ भारत अभियान’ ही चळवळ २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू केली.या चळवळीस तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत एक राष्ट्रव्यापी मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत सेवा दिवस, समग्र स्वच्छता दिवस, सर्वत्र स्वच्छता दिवस, श्रेष्ठ स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील विविध घटकातील समुदायांना एकत्रित करून त्यांना श्रमदानात सहभागी करून घेणे, शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारक यांची स्वच्छता करणे तसेच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांची व प्रसिद्घ स्थळांची स्वच्छता करणे आदी कार्यक्रम अंतर्भूत आहेत. या मोहिमेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

मनपा मुख्यालयात शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मोहिमेचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होईल. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, राकाँचे पक्ष नेते दुनेश्वर पेठे, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, आरोग्य समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, सर्व नगरसेवक, अधिकारी, सहायक आयुक्त आदी उपस्थित राहतील.

असा असणार मोहिमेचा कार्यक्रम

१५ सप्टेंबर – स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा शुभारंभ
१७ सप्टेंबर – सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रमदान करून सेवा दिवस साजरा करणे.
२४ सप्टेंबर – समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करून घेऊन समग्र स्वच्छता करणे.
२५ सप्टेंबर – शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची व्यापक प्रमाणात सफाई करून सर्वत्र स्वच्छता करणे.
१ ऑक्टोबर – शहरातील प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी व्यापक श्रेष्ठ स्वच्छता मोहीम राबविणे.