Published On : Wed, Jun 27th, 2018

शिकवणी संचालकाची हत्या करणारा निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक

Advertisement

लातूर : लातूरमध्ये ‘स्टेप बाय स्टेप’ या क्लासच्या संचालकाची हत्या करणारा आरोपी चक्क राज्याचे कामगार कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक असल्याचं उघड झालं आहे. या बातमीमुळे अवघ्या मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी क्लास संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात ज्या पाच जणांना अटक केली आहे, त्यात मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक करण सिंह याचा समावेश असल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोपी हा निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक असल्याचे समोर येताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि व्हॉट्सअॅपवर संभाजी पाटील निलंगेकर आणि करण सिंह यांच्या घनिष्ट संबंधांचे पुरावे देणारे फोटो अवघ्या महाराष्ट्रात वायरल होऊ लागले. त्यामुळे मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक हा सुपारी किलर आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

दरम्यान, याबाबत निलंगेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. करण सिंह आपला सुरक्षारक्षक नव्हता, असा दावा संभाजी पाटील निलंगेकरांनी केला आहे. तो आपल्या विधानसभा मतदारसंघातला कार्यकर्ता होता. करणला तुमच्यासोबत कामाला ठेवा, अशी विनवणी त्याच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर तो आपल्यासोबत होता. करण कधी शिवसेनेचा कार्यकर्ता होता, तर कधी मनसेचा. दोन महिन्यापासून तो राजकीय ग्रुपचाही सभासद होता, असंही निलंगेकर म्हणाले.

अनेक कार्यक्रमांमध्ये उत्साही कार्यकर्ते आमदार-मंत्र्यांसोबत फोटो घेत असतात. मात्र त्यांचा संबंध असेलच असं नाही. हत्येसारखी घटना जिल्ह्यासाठी चांगली नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी पाटील निलंगेकरांनी दिली आहे.