नागपूर : नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्यांमध्ये होणाऱ्या मारामारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा जेलमध्ये हिंसक प्रकार घडला. यामध्ये पुण्याचा कुख्यात गुंड प्रवीण श्रीनिवास महाजन सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सकाळच्या वेळी कैदी नेहमीप्रमाणे नळावर पाणी भरण्यासाठी रांगेत उभे होते. त्यावेळी यशपाल चव्हाण आणि ताजाबादचा गुन्हेगार तौसीफ इब्राहीम यांच्यात बादली लावण्यावरून वाद झाला. हा वाद चिघळत असतानाच प्रवीण महाजन तेथे पोहोचला आणि त्याने तौसीफवर तुटून पडत लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्याने तौसीफला ठार मारण्याची धमकी दिली, असेही समजते.
या घटनेमुळे जेल परिसरात काही वेळ गोंधळ उडाला. तत्काळ जेल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि धंतोली पोलिसांना कळविण्यात आले. जेल प्रशासनाच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी प्रवीण महाजनविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, गेल्या आठवडाभरात नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्यांमधील मारामारीची ही दुसरी घटना आहे. प्रवीण महाजनचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. मे २०२१ मध्ये त्याने पुण्यात एका पोलिस सिपायाची हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला येरवडा जेलवरून नागपूर सेंट्रल जेलमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, येथेही तो सतत हिंसक प्रकारांमध्ये गुंतलेला दिसत आहे.