Published On : Sat, Nov 9th, 2019

शहराला ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांची माहिती : आरोग्य समितीची बैठक

नागपूर: नागपूर शहराला आता ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. हे सर्व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे प्राप्त झाले असल्याचे वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले. शुक्रवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आरोग्य समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी समिती उपसभापती नागेश सहारे, समिती सदस्य लहूकुमार बेहेते, लिला हाथीबेड, विशाखा बांते, सरिता कावरे, कमलेश चौधरी, आशा नेहरू उईके, संजय बुर्रेवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे यांच्यासह सर्व झोनल अधिकारी व स्वास्थ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर शहराला ओडीएफ प्लस प्लस हे मानाकंन प्राप्त झाले आहे. हे कायम टिकवणे हे महत्वाचे आहे. प्रत्यक्ष ठिकाणी कामाचा दर्जा अधिक सुधारणे गरजेचे आहे. हे मानांकन प्राप्त झाल्याने स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचे नाव उंचावणार आहे. यासाठी आयुक्तांनी विशेष प्रयत्न केले आहे. ते कायम ठेवणे आपल्या हातात असल्याचे सभापती कुकरेजा यांनी सांगितले.

प्रारंभी समितीतील कमलेश चौधरी, आशा नेहरू उईके, कमलेश चौधरी यांचा सत्कार आरोग्याधिकारी डॉ.सुनील कांबळे यांनी केला.

किटकजन्य आजारांवर व डेंग्यू रोगावर उपाययोजना संबंधी यावेळी चर्चा करण्यात आली. डॉ.भावना सोनकुसळे यांनी डेंग्यू रोगाबद्दल काय उपाययोजना मनपाद्वारे करण्यात येतात, याबद्दल माहिती दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर शहरातील डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळला की, त्याकडे जाऊन फवारणी करण्यात येते. शहारतील ६२४ नोंदणीकृत खासगी दवाखाने आहे. या दवाखान्यातही जर डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळला तर त्याची नोंदणी आपल्या महानगरपालिकेद्वारे करण्यात येते. नागपूर शहरात आतापर्यंत १९४ डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळले आहेत. डेग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याची डॉ.भावना सोनकुसळे यांनी सांगितले. मोकळ्या ठिकाणी पाणी साचून राहता कामा नये, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मोकळ्या भूखंडावरही पाणी साचता कामा नये, याकडे झोनल अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या भागात पाणी साचून राहते त्यांना नोटीस बजावण्यात यावा किंवा दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. व्हॉट्सद्वारे डेंग्यूबद्दल जनजागृती करणारे मॅसेजेस पाठविण्यात यावे, असे निर्देश सभपाती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० बद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण तीन टप्प्यात असणार असून दोन टप्पे पूर्ण झाले आहे. यामध्ये चार वर्गीकरणात गुण प्राप्त होणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षणाकरिता स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता अॅप वर किती तक्रारी प्राप्त झाल्या त्या किती प्रमाणात सोडविण्यात आल्या यावरही गुण प्राप्त होणार आहे. स्वच्छता अॅप डाऊनलोड करावी, असे आवाहन सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले.

शहरातील कचरा उचलण्यासाठी नेमण्यात आलेल्या दोन कंत्राटदारांना यावेळी बैठकीत बोलविले होते. येत्या १५ तारखेपासून नवीन संस्था कचरा उचलण्याचे कार्य करणार आहेत. त्यांच्या कामाची कार्यपद्धती यावेळी सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी जाणून घेतली. कचरा घरातून गोळा करताना वर्गीकरण करून घ्यावा, कुठलाही हलगर्जीपणा चालवून घेतला जाणार नाही, असा इशाराही सभापती श्री.कुकरेजा यांनी दिले.

गड्डीगोदाम परिसरात पावसाचे पाणी साचून राहते याबाबत वारंवार तक्रारी दाखल होत होत्या. याबाबत त्या नाल्याचे काय करता येईल याचा सविस्तर अहवाल मला लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश सभापती वीरेद्र कुकरेजा यांनी संबंधित झोनल अधिकाऱ्याला दिले.

ओडीएफ प्लस प्लस मुळे नागपूर शहराचा दर्जा सुधारला
नागपूर शहराला शुक्रवारी ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झाले. यामुळे नागपूर शहराचा दर्जा सुधारला आहे. ही सर्व शहरवासियांसाठी आनंदाची बाब आहे. हा दर्जा नागपुरातील सामुदायिक व सार्वजनिक शौचालयातील स्वच्छतेची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हे मानांकन मिळाले. यापूर्वी शहराला ओडीएफ प्लस हे मानांकन मिळाले होते. ओडीएफ प्लस प्लस या मानांकनाने त्यात भर घातली. नागपूर महानगरापलिकाद्वारे शहरात ७० सामुदायिक शौचालये व ६८ सार्वजनिक शौचालये निर्माण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महिलांसाठी १५ शौचालये तयार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षणाच्या केंद्रातील चमूंनी या शौचालयाचा दौरा केला. नागपूर महानगरपालिकेने १३५०० व्यक्तिगत शौचालयाचे निर्माण केले आहे. यामुळे शहर हे पूर्णतः हागणदारीमुक्त झाले आहे. नागपूर येथे ३३० एमएलडी सांडपाण्याचा पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातील २०० एमएलडी पाणी महाजनको ला देण्यात येत असून १३० एमएलडी पाण्याचा नागपूर महानगरपालिका वापर करत आहे. शहराला ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झाल्याबद्दल महापौर नंदा जिचकार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व्यक्त केले. अतिशय आनंदाचा क्षण असून यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरचे स्थान उंचवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल असे त्या यावेळी म्हणाल्या.

मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनीही यावेळी गौरवाचा क्षण असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे. ओडीएफ प्लस प्लस मानांकनामुळे आता जबाबदारी वाढली आहे. असेही आयुक्त यावेळी म्हणाले.