Published On : Thu, Mar 12th, 2020

नागरिकांनी घाबरुन जाऊ नये; काळजी घ्‍यावी – ठाकरे

जिल्हा प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज, कोरोना बाधीत संशयितांच्या स्क्रीनींगसाठी रेल्वे स्टेशन, विमानतळावर विशेष कक्ष, मास्कचा तुटवडा करणारांवर कडक कार्यवाही करा

नागपूर: कोरोना विषाणूबाबत नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज केले.

छत्रपती सभागृह येथे कोरोना विषाणूसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या संदर्भात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, मेडीकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. व्ही. डी. पातूरकर, डॉ. अजय केवलिया, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, एनडीआरएफचे कृपल मुळे, डॉ. भावना सोनकुसळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करत जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग व इतर आवश्यक विभागांशी समन्वय साधून ही कार्यवाही करण्यात येत आहे. कोविड-19 या आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण देण्यासाठी तसेच हात स्वच्छ धुणे, खोकताना- शिंकताना घ्यावयाची काळजी, खोकणाऱ्या, शिंकणाऱ्या व्यक्तीपासून तीन फूट अंतर ठेवणे अशा महत्त्वाचे संदेश देत शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, मॉल्स, स्विमिंग पुल, मंगल कार्यालये, मंदीर तसेच यात्रास्थळे येथे जनजागृती करण्यासाठी बस स्टँड, एसटी पॅनल, होर्डींग्ज, दूरदर्शन, रेडिओ अशा विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, अशा सूचना श्री. ठाकरे यांनी संबंधीत विभागप्रमुखांना केल्या.


कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्त जोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी तसेच कमी जोखमीच्या व्यक्तिंनी 14 दिवस घरीच थांबण्यास सांगावे. अशा व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यासाठी नागपुरात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, रेल्वे विभागाकडेही 200 बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी यावेळी केले. रुग्णांचे स्क्रीनिंग, संशयित रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि आरोग्य शिक्षण या बाबींसाठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉल रुग्णालयातील विशेषज्ञांनी तयार करावा. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्यावी आणि त्यापैकी एखाद्या प्रवाशास ताप, खोकला असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महानगर पालिका, आरोग्य विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि इतर सर्व संबंधित विभागात योग्य समन्वयातून टीम यावर लक्ष ठेवणार आहे. कोरोना संशयिताबाबतची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी समन्वय ठेवण्यात येणार असून, संशयित हा इतर जिल्ह्यातून आला असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे म्हणाले.

मॉस्कचा काळाबाजार करणारांवर कडक कार्यवाही करणार
कोरोना विषाणूंच्या भितीमुळे नागरिकांनी अजिबात घाबरुन जावू नये. तसेच विक्रेत्यांनी मास्कचा मानवनिर्मित तुटवडा निर्माण केल्यास तसचे निर्धारीत दरापेक्षा जास्त किमतीला विकत असल्याचे आढळून आल्यास आणि बोगस मास्कची विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले.