Published On : Tue, Feb 18th, 2020

महापौरांच्या जनता दरबारात नागरिकांचे समाधान

गांधीबाग झोनमध्ये ५१ तक्रारींवर सुनावणी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये मंगळवारी (ता. १८) झालेल्या जनता दरबारात नागरिक घेऊन आलेल्या तक्रारींवर महापौर संदीप जोशी यांनी सुनावणी करीत तक्रारकर्त्यांचे समाधान केले. ५१ तक्रारींवर सुनावणी करीत त्यांनी तातडीने सोडविणे शक्य असलेल्या समस्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सकाळी १० वाजता गांधीबाग झोन कार्यालय परिसरात असलेल्या श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवनमध्ये जनता दरबाराची सुरुवात झाली. यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सहायक आयुक्त अशोक पाटील, नगरसेवक मनोज चापले, राजेश घोडपागे, नगरसेविका नेहा वाघमारे, जिशान मुमताज उपस्थित होते.

यावेळी गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नागरिकांनी आपल्या समस्या महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबारात मांडल्या. विहीत मुदतीत १८ तक्रारकर्त्यांनी नोंदणी केली होती. जनता दरबाराच्या निर्धारीत वेळेत १८ तक्रारींव्यतिरिक्त ३३ तक्रारी आल्या. या सर्व तक्रारींवर महापौर संदीप जोशी यांनी तक्रारकर्त्यांशी संवाद साधत त्यांची कैफियत जाणून घेतली. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. नोंद झालेल्या १८ तक्रारींपैकी काही तक्रारींवर जनता दरबारापूर्वीच कार्यवाही झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जनता दरबारात अतिक्रमण, मालमत्ता कर, पाणी बिल आणि विहीर स्वच्छतेच्या तक्रारी अंतर्भूत होत्या.

नागपूर महानगरपालिकेच्या बंद अवस्थेत असलेल्या शाळांना पुनरुज्जीवन देण्यात यावे आणि गोरगरीब जनतेच्या मुलांच्या हितासाठी त्या पुन्हा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी करणारे एक शिष्टमंडळही जनता दरबारात आले होते. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर संदीप जोशी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक लावण्याचे निर्देश दिले. या मागणीवर सकारात्मक भूमिका जाहीर करून अंमलबजावणी करु, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. जनता दरबारात संबंधित विभागाचे अधिकारी आणि तक्रारकर्ते नागरिक उपस्थित होते.